महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

अत्याधुनिक तंत्रज्ञानातून ‘चांगल्या डिजिटल जगाची’ निर्मिती करा – स्पेस एप्लिकेशन्स सेंटर चे माजी संचालक डॉ. निलेश देसाई

पीसीसीओइ येथे आयइइइ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घघाटन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २२ ऑगस्ट २०२६) उपग्रह तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातील डिजिटल जगाची महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून ‘चांगल्या डिजिटल जगाची’ निर्मिती करावी. भारताने या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करणे आवश्यक आहे. एनएवीएलसी सारख्या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे दळणवळण, नेव्हिगेशन आणि संरक्षण क्षेत्राला मोठी ताकद मिळते. भविष्यात स्मार्टफोन पासून उपग्रह संप्रेषण पर्यंत तंत्रज्ञान अधिक सक्षम आणि सर्वव्यापी होईल. या परिवर्तनात भारतातील तरुण संशोधक महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा स्पेस एप्लिकेशन्स सेंटर अहमदाबाद चे माजी संचालक डॉ. निलेश देसाई यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘चांगल्यासाठी तंत्रज्ञान: एक उत्तम डिजिटल जगाची उभारणी’ या विषयावर आधारित १० व्या आयइइइ संगणक संचार नियंत्रण आणि स्वचालन २०२६ (आयसीसीयूबीइए) सिग्नल प्रोसेसिंग सोसायटी पुणे चॅप्टर यांच्या सहकार्याने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी निलेश देसाई बोलत होते. यावेळीआयसीसीयूबीइए २०२६ च्या स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बीआयटीएस) पिलानी समूह कुलगुरू डॉ. व्ही. रामगोपाल राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. रावसाहेब लटपटे, आयइइइ पुणे सेक्शनचे प्रतिनिधी डॉ. मंदार भवाळकर, पीसीसीओइ चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीइटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, आयसीसीयूबीइए २०२६ च्या जनरल चेअर डॉ. सोनाली पाटील, व्हा. जनरल चेअर डॉ. वर्षा के. हरपळे, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेसाठी भारत आणि परदेशातून एकूण २,२६३ संशोधन प्रबंध प्राप्त झाले, त्यापैकी २३८ संशोधन प्रबंधांचे या परिषदेत सादरीकरण केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, कम्युनिकेशन, कंट्रोल, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच भविष्यातील डिजिटल तंत्रज्ञानातील संशोधन व नव कल्पनांवर चर्चा सत्र करण्यात आली.

डॉ. व्ही. रामगोपाल राव म्हणाले की, आयसीसीयूबीइए च्या दहाव्या आवृत्तीपर्यंतचा प्रवास ही पीसीसीओइ च्या संशोधन, नवोन्मेष आणि शैक्षणिक गुणवत्तेची महत्त्वपूर्ण नोंद आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीसोबतच त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी होणे आवश्यक आहे. संशोधक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्यामुळे संशोधनाला व्यावहारिक स्वरूप मिळते.

डॉ. रावसाहेब लटपटे यांनी सांगितले की, तंत्रज्ञान अधिक प्रगत होत असताना त्याचा केंद्रबिंदू मानव आणि समाजहित असणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, कम्युनिकेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास हा जबाबदार, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि शाश्वत असला पाहिजे.

डॉ. मंदार भवाळकर यांनी सांगितले की, यावर्षी २,२६३ संशोधन निबंध प्राप्त होणे आणि कठोर समीक्षा प्रक्रियेनंतर निवडक संशोधन निबंधांचे सादरीकरण होणे, हे परिषदेची गुणवत्ता आणि जागतिक स्वीकारार्हता दर्शवते.

आयसीसीयूबीइए २०२६ च्या जनरल चेअर डॉ. सोनाली पाटील यांनी परिषदेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली.

स्वागत पीसीसीओइ चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोनल शिर्के यांनी आणि आभार डॉ. वर्षा हरपळे यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button