पीसीपीच्या वेदांत बलकवडे याचे आयआयटी मुंबई ‘युरेका’ मध्ये उत्कृष्ट सादरीकरण
"समुद्रातील कचऱ्याचा पुनर्वापर" प्रकल्पास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस

पिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२६) आयआयटी मुंबई यांच्या वतीने “युरेका” ही नव संकल्पना आणि स्टार्टअप प्रकल्प सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील वेदांत ऋतुराज बलकवडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या “समुद्रातील कचऱ्याचा पुनर्वापर” (‘ओशन वेस्ट रिसायकलिंग’) या नावीन्यपूर्ण प्रकल्पास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
“युरेका” या आशियातील सर्वात मोठ्या नव संकल्पना आणि स्टार्टअप प्रकल्प सादरीकरण कार्यशाळेत देशभरातून एकूण ४३,००० प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यापैकी अंतिम फेरीत ८० प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये बलकवडे यांच्या “समुद्रातील कचऱ्याचा पुनर्वापर” (‘ओशन वेस्ट रिसायकलिंग’) या प्रकल्पाने सर्व परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. समुद्रात जमा होणारा कचरा ही जागतिक पर्यावरणासाठी मोठी समस्या आहे. समुद्रातील प्लास्टिक व इतर घनकचऱ्याचे संकलन करून त्यावर पुनर्प्रक्रिया करता येईल. यामुळे समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होईल. तसेच त्या कचऱ्यातून आकर्षक उपयोगी उत्पादने तयार करून रोजगार निर्मितीस चालना मिळेल. या प्रकल्पासाठी प्रा. गणेश कुमार राजे, प्रा. शांतेश्वर धानुरे, प्रा. सतीश बिन्हाडे यांनी मार्गदर्शन केले होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीपीच्या प्राचार्य डॉ. विद्या बॅकाॅड यांनी वेदांत बलकवडे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
——————————————————————



