संशोधनाचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी व्हावा – पद्मश्री व माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव
तरुण संशोधकांसाठी इनोव्हेशन इकोसिस्टम आवश्यक - पद्मश्री व ज्येष्ठ उद्योजक मा. प्रतापराव पवार, पीसीयू मध्ये "इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र" चे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. २२ मार्च २०२६) संशोधनाचा समाज, उद्योग आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा. सरकारने संशोधनास आणखी प्रोत्साहन दिले तर २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिपादन पद्मश्री व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे “इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र” चे (Center of Innovation and Entrepreneurial Excellence – CIEE) चे उद्घाटन डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे एआयसीटीइचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, पद्मश्री व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन डॉ. श्रीकांत पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संजय सोनवणे, महाराष्ट्र औद्योगिक परिषदचे उपाध्यक्ष सचिन इटकर व विविध नामांकित संशोधन संस्था मधील प्रतिनिधी, उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे पद्मश्री व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात, केवळ ज्ञान मिळवणे पुरेसे नाही, तर नवीन संकल्पना सादर करणे, त्या प्रत्यक्षात उद्योग व्यवसायात उतरवणे आणि त्यातून समाजासाठी संपत्ती निर्माण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी शिक्षण संस्था, उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यातील मजबूत सहकार्य ही काळाची गरज आहे. भारतीय तरुण संशोधकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. पीसीयू येथील “इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र” (“Center of Innovation and Entrepreneurial Excellence – CIEE)” विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच देत नाहीत, तर त्यांना समस्या सोडवणारे, स्टार्टअप आणि रोजगार निर्माण करणारे बनवतात.
हा केवळ एका केंद्राचा प्रारंभ नसून, नवोन्मेषी भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. युरोपियन देशांप्रमाणे उद्योग शैक्षणिक सहकार्याचा मजबूत पाया भारतात उभारणे आवश्यक आहे. उद्योगांनी केवळ नोकऱ्या देण्यापुरते मर्यादित न राहता, संशोधन, इनक्युबेशन आणि उत्पादन विकासात सक्रिय सहभाग घ्यावा. बारामती येथे उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. या केंद्राद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डेटा आधारित निर्णय प्रक्रिया, स्मार्ट शेती आणि उद्योगांसाठी उपाययोजना यामुळे ग्रामीण व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे भारतातील नवोन्मेष अधिक वेगाने पुढे जाईल याची खात्री आहे. पीसीयू संस्था देशातील अग्रगण्य इनोव्हेशन हब म्हणून ओळखली जाईल असा विश्वास प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.

पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, पीसीयू मध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांना चालना देण्यासाठी देशभरातील नामांकित शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, उद्योग तज्ज्ञ व शासकीय अधिकारी यांचा सहभाग आणि मार्गदर्शन मिळते. येथील तरुण संशोधकांनी नव संकल्पना सादर केल्यास त्यांचा विकास, स्टार्टअप, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभारणी साठी प्रोत्साहन देण्यात येते. त्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आयसीटी मुंबई, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि फोर्ब्स मार्शल सारख्या आघाडीच्या समूहांचे सहकार्य मिळत आहे.

पीसीयू कुलपती व पीसीइटी विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांनी सर्व सहभागी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.
—————————————————————————–



