पद्मश्री प्रतापराव पवार कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र पुण्यात होणार
प्रतापराव पवार म्हणजे सामाजिक उद्योजकतेचे मूर्तिमंत उदाहरण - डॉ. गिरीश देसाई


पिंपरी, पुणे (दि. १५ ऑगस्ट २०२६) ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचे वर्णन व्यक्ती म्हणून नव्हे तर संस्था म्हणून करावे लागेल. एखादा उद्योजक जीवनात उद्योग व्यवसायांसोबत अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतो याचे प्रतापराव पवार साहेब मूर्तिमंत उदाहरण आहेत. वक्तशीरपणा, गुणग्राहकता, संवेदनशीलता, निर्णयातील स्पष्टता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. सतत नाविन्याचा ध्यास आणि आपण जे पाहिले, अनुभवले ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याची त्यांची तळमळ थक्क करणारी आहे.

प्रतापराव पवार यांचे प्राथमिक शिक्षण बारामतीमध्ये झाले. नंतर ते प्रतिष्ठित बिट्स पिलानीमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी गेले. आपल्या बंधूंसोबत त्यांनी फाउंड्री व केमिकल्सच्या व्यवसायाचा विस्तार केला. ऐंशीच्या दशकात ते वृत्तपत्र व्यवसायात आले. नानासाहेब परुळेकर यांच्या वैचारिक चौकटीला धक्का न लावता त्यांनी ‘सकाळ’चा खप आणि लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता वाढवली. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यात त्यांची प्रगल्भता आहे. अनेकांचा असा गैरसमज होतो की त्यांचे ज्येष्ठ बंधू शरद पवार यांच्यामुळे ते उद्योजक म्हणून यशस्वी ठरले. शरद पवार साहेब ६७-६८ मध्ये राजकारणात आले. त्या आधीपासून प्रतापराव उद्योगात होते व देशातील अनेक प्रतिष्ठित कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. तसेच पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. आज देशातील नामवंत उद्योजकांमध्ये त्यांचे नाव आहे. व्यवसाय करताना त्यांनी अनेक चॅरिटेबल ट्रस्ट पुनर्जीवित केले. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीओईपी) कायापालट त्यांनी केला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्ष राहिले आहेत. ही संस्था वाढवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. तरुण पिढीने उद्योगात आले पाहिजे म्हणून ते सतत मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यांच्या उद्योजकतेला सामाजिकतेची जोड आहे. हे फार दूर्मीळ आहे.

पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (PCU) गव्हर्निंग बॉडीमध्ये ते इंडस्ट्री एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत. उच्चशिक्षणामध्ये उद्योग आधारित कौशल्य, संशोधन आणि अकॅडमी-इंडस्ट्रीमधील अंतर कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न आमच्या संस्थेला खूप उपयुक्त ठरतात. सकाळ इंडिया फाउंडेशन, विद्यार्थी साहाय्यक समिती, अंधशाळा तसेच पुण्यातील जोशी हॉस्पिटल व रत्ना मेमोरियल हॉस्पिटलच्या जनक संस्थेचे म्हणजे महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनशी त्यांचा गेली अनेक दशके विश्वस्त आणि अध्यक्ष या नात्याने निकटचा संबंध आहे. गरज भासेल तेव्हा ते या संस्थांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून येतात; मात्र कोणत्याही एकाच संस्थेत किंवा पदाच्या चौकटीत ते कधीही अडकून पडत नाहीत. समाजासाठी निस्वार्थपणे चांगलं काम करणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभं राहायचं, पण स्वतः कुठल्याही मोहजाळात अडकायचं नाही, हे ते जाणीवपूर्वक पाळत आले आहेत.

विद्यार्थी सहायक समिती या संस्थेत त्यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेले उपक्रम, एखाद्या विद्यार्थ्याने नवे काही केले की, ते समजून घेऊन त्याला कशी मदत करता येईल, यासाठीचे त्यांचे प्रयत्न, कोण कुठे भेटले आणि समितीशी संबंधित विषय वाटला की त्याला जोडण्यासाठीचे प्रयत्न, दरवर्षी संस्थेसाठी आर्थिक योगदान देतानाच यावर्षी संस्थेच्या भविष्याचा विचार करून दिलेली मोठी मदत या साऱ्यांतून त्यांचे मोठेपण लक्षात येते. आपण समाजाचे देणे लागतो ही त्यांची जाणीव सतत जागृत असते. संस्था सांभाळणं, वाढवणं आणि त्याला नावलौकिक मिळवून देणं, यासाठी विशेष गुणांचा कस लागतो, जो प्रतापराव पवार यांच्या मध्ये आहे. शिस्तबद्धता, नि:स्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने त्यांनी आपली छाप या संस्थांवर उमटवली आहे. त्यांच्या औद्योगिक, सामाजिक व व्यवस्थापन क्षेत्रातील दीर्घ अनुभवातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ या संस्थांना झाला आहे.

शेतीक्षेत्र त्यांचे आवडीचे क्षेत्र आहे. कृषी आधारित उद्योगाशीही त्यांचा संबंध आहे. सध्या कृत्रिम प्रज्ञा – एआय चा जगभर बोलबाला आहे त्यांनी त्याचे महत्त्व ओळखले. एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग भारतीय शेती व शेतकऱ्यांसाठी कसा करता येईल, यासाठी त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठान आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने त्यांनी एआय आधारित कृषी उपक्रमाला प्रोत्साहन दिले. उसाचे उत्पन्न वाढवून खर्च कमी करण्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत या प्रयोगाला आपल्या योजनेत सामील केले आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या कामानिमित्त
मी गेली अनेक वर्षे त्यांना भेटतो आणि पाहतो आहे. टाय लावलेले, टापटीप कपडे, शांतपणे बोलणारे, अतिशय अदबीने वागणारे आणि वेळेच्या बाबतीत अतिशय कडक शिस्त पाळणारे प्रतापराव पवार म्हणजे अर्थ, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान, माहिती, समाजकारण, माध्यम अशा विविध क्षेत्रातील एक चालते बोलते विद्यापीठ आहे. ते नेहमी आपल्या तंदुरुस्ती विषयी जागरूक असतात. आपल्या प्रचंड व्यस्त कामांतूनही ते रोज व्यायामासाठी वेळ काढतात. जी व्यक्ती व्यायामासाठी एक तासही वेळ काढू शकत नसेल तर त्याचं टाइम मॅनेजमेंट चुकतंय असं त्यांचं स्पष्ट मत आहे. हा गुरु मंत्र आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक आहे.
अशा बहु आयामी बहुगुणी व्यक्तिमत्व असणाऱ्या पद्मश्री प्रतापराव पवार साहेबांना निरोगी, निरामय, दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना आणि सदिच्छा.
शब्दांकन –
डॉ. गिरीश देसाई
कार्यकारी संचालक,
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे




