विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा शनिवारी भव्य नागरी सत्कार सोहळा


पिंपरी, पुणे (दि. २८ सप्टेंबर २०२६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता अण्णासाहेब बनसोडे यांचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे हे भूषवणार आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, खासदार पार्थ पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, शंकर जगताप, गोपीचंद पडळकर, उमाताई खापरे, शंकर मांडेकर, बापू पठारे, सुनील कांबळे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, सुनील टिंगरे आदी उपस्थित राहणार आहेत.

हॉटेल रागा पॅलेस, काळेवाडी विजयनगर पिंपरी (मदर टेरेसा उड्डाणपूल लगत) येथे सकाळी ११ वाजता, हा भव्य नागरी सत्कार सोहळा होणार आहे. याचे आयोजक महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे गौरव समिती पिंपरी चिंचवड शहर आणि सहआयोजक नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड, गोपाळ मोरे, निलेश निकाळजे, प्रमोद क्षीरसागर, गंगाताई धेंडे, नितीन ओव्हाळ, संदीप पिसाळ, राहुल सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे ध्येय ठेवून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक वारसा पुढे नेणारी ही एक महत्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहे. सध्या या संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आहेत. या संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती होणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.

अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभाग घेऊन सुरुवात केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, पिंपरी विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष पद असा अण्णासाहेब बनसोडे यांचा राजकीय चढता आलेख आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ऐतिहासिक संस्थेवर अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करून सरकारने त्यांचा आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा सन्मान केला आहे अशी भावना शहरवासीयांच्या मनात आहे. अण्णा बनसोडे यांच्या या नियुक्तीमुळे शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे हा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने शनिवारी (दि.३) सकाळी ११ वाजता हजारो नागरिकांनी हॉटेल रागा पॅलेस येथील भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
—————————————————————–




