महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खा. संजय राऊत

खा. संजय राऊत आणि माजी खा. विनायक राऊत यांच्या हस्ते "उद्धव श्री पुरस्कार" वितरण

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २१ ऑगस्ट २०२६) कलाकारांना, क्रीडापटूंना, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला आहे. रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे जबाबदारीने काम करीत आहेत. कोरोना काळात अवघे जग ठप्प झाले असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी घेतली होती. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. त्यांच्या नावे दिलेले पुरस्कार हा सन्मान आहे. जिथे संकट तिथे शिवसेना अशा पद्धतीने सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करीत आहे. शिवसेनेने अगोदर काम केले आणि मग मतं मागितली. तर विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने “उद्धव श्री पुरस्कार २०२६” चे वितरण खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी खा. विनायक राऊत यांनी सांगितले की, सध्या राजकारणात पुढे पुढे करणाऱ्यांचे दिवस आहेत. प्रामाणिक माणसांच्या पदरी उपेक्षा पडत आहे, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे. महाराष्ट्रातील ३६ हजार उद्योग बंद पडले आहेत हे महाराष्ट्राला लाजिरवाने आहे. उद्योजकांना दिलासा देण्या ऐवजी त्रास दिला जात आहे. महाराष्ट्रात त्यांच्यावर सर्वात जास्त टॅक्स लावला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या चेतन पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास आहे असे माजी खा. विनायक राऊत यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान आहे. यातील अनेकांनी कोरोना सारख्या जोखीम काळात देखील पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले आहे.

डॉ. संतोष लाटकर (वैद्यकीय), डॉ. रोहन काटे (वैद्यकीय), प्रा. तुकाराम पाटील (साहित्यिक), काशिनाथ नखाते (कामगार), प्रीती वैद्य (सामाजिक), चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी (क्रीडा) पै. योगेश्वर तापकीर (क्रीडा) भाग्यश्री मोरे (सामाजिक), रामदास काटे (कृषी) आणि डॉ. संजीव कुमार पाटील (कला), शौर्या भरणे (क्रीडा), रियाज शेख (कुस्ती) आणि भाग्यश्री मोरे (दिव्यांगांसाठी कार्य) यांचा “उद्धव श्री पुरस्कार २०२६” सन्मान करण्यात आला.

यावेळी वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड, पिंपळे निलख येथील युवक आणि युवतींनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे खा. संजय राऊत यांनी स्वागत केले.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच रोमी संधू, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे, सुशीला पवार, विजय सुळे, गजानन थरकुडे, सुनील सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती भावे, सचिन मगर, नितीन घोलप आदीं उपस्थित होते.

शिवसेना पक्ष फुटीवर सध्या आमच्या पक्षाच्या युक्तिवाद न्यायालयात संपला आहे. फुटीर गट सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही ते फक्त त्यांचं म्हणणं मांडू शकतात. ते सुरतला कसे गेले, गुवाहाटी आणि गोव्याला कसे गेले आणि किती, कुठे, कसं शेण खाल्लं हे फक्त ते न्यायालयासमोर मांडू शकतात ते युक्तिवाद करू शकत नाही अशी बोचरी टीका खा. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button