शिवसेनेच्या वतीने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन – सुलभा उबाळे
दिव्यांग बांधवांनाही मिळणार रोजगाराच्या संधी - विश्वजीत बारणे


पिंपरी, पुणे (दि. १९ ऑगस्ट २०२६) मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी ( दि. ३० ऑगस्ट) सकाळी ९ वाजता, चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, समन्वयक किरण राहणे, दीपक पवार आदी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यात बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील कंपन्या व उद्योग प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती सुलभा उबाळे यांनी दिली.

विश्वजीत बारणे यांनी सांगितले की, या मेळाव्यात ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया अशा नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. अवघ्या पाचवी पास झालेल्या उमेदवारापासून ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्यांनुसार योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यात करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांना मेळाव्याच्या दिवशी थेट नोकरी मिळणार नाही, अशा उमेदवारांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यांची माहिती संकलित करून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या योग्य रोजगाराच्या संधींबाबत त्यांना मार्गदर्शन करून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सहभागी उमेदवारांना भविष्यातील रोजगाराच्या संधींशी जोडणारा हा उपक्रम आहे.
महिलांसाठीही या मेळाव्यात स्वयंरोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास व व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या संधींबाबत माहिती देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
——————————————————————




