महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

कामगार चळवळ राजकारण विरहित असावी – डॉ. भारती चव्हाण

कामगारांची वज्रमूठ होणे आणि राजकारण विरहित लढा देणे गरजेचे - डॉ. भारती चव्हाण

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २७ नोव्हेंबर २०२६) कामगारांच्या न्याय हक्कांसाठी, आर्थिक, सामाजिक सुरक्षेसाठी अनेक उद्योगात कामगार संघटना लढा उभारून संघर्ष करीत असतात. कामगारांचे संघटन आणि नेतृत्व सक्षम असेल तर अनेक लढ्यात कामगार संघटना यशस्वी होतात. परंतु ज्या लढ्यात राजकारण घुसते, तेथील कामगार चळवळ संपुष्टात येते याचे अनेक दाखले आपल्याकडे आहेत. त्यामुळे कामगार चळवळ राजकारण विरहित असावी असे प्रतिपादन गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे मगर स्टेडियमच्या मोबदल्यात हस्तांतरित झालेल्या भूखंडाच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. २६) खराळवाडी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या निमंत्रित कामगार कार्यकर्ते आणि गुणवंत कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे अल्फा लावल संघटनेचे अध्यक्ष तथा प्रमुख निमंत्रक किरण देशमुख यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात मंडळाचे कोषाध्यक्ष महंमद शरीफ मुलाणी, सचिव राजेश हजारे, कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे, बाळासाहेब साळुंके, भरत शिंदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, प्रकाश यादव, शंकर नाणेकर, दीपक पवार, शिवाजी वलवणकर, आकाश पालकर, विजय बडगुजर, सुरेश शिंदे, प्रकाश हुंबे, मुस्तफा मुलाणी आदींसह अनेक युनियन प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या संदर्भातील ३४ वर्षाच्या संघर्षाचा आणि इतिहासाचा मागोवा घेत डॉ. भारती चव्हाण पुढे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड या कामगार नगरीत महानगरपालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देऊ केलेल्या भूखंडावर भव्य सांस्कृतिक भवन उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. परंतु येथे कामगारांच्या हिताचा विचार केला जात नाही असे दिसते. कामगारांच्या घामातून उभारलेल्या स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियम सारख्या इतर योजनांचा लाभ कामगारांना व्हावा, तो त्यांचा हक्क आहे. यात यशस्वी होण्यासाठी आता कामगारांची वज्रमूठ होणे आणि राजकारण विरहित सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना महंमद शरीफ मुलाणी यांनी सांगितले की, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांनी राष्ट्रीय प्रवाहात सक्रिय राहवे यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असते.

राजेश हजारे यांनी सांगितले की, या कामगार नगरीत आगामी काळात उभारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हित जपावे आणि त्यास विधायक कार्यांची आणि दीर्घकालीन योजनांची जोड द्यायला हवी.

तानाजी एकोंडे यांनी नियोजित सांस्कृतिक भवनाची रूपरेषा कशी असावी याची माहिती दिली.

किरण देशमुख म्हणाले की, इतिहास घडवणारी माणसे कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. ‘कामगार हिताय, कामगार सुखाय’ याप्रमाणे कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

बाळासाहेब साळुंके, शिवराज शिंदे, अशोक सरतापे, नंदकुमार धुमाळ, पांडुरंग सुतार, विजय गुजर, विजय पाटील, पोपट भालेराव, दिलीप कोंडे, पंडितराव पवार, हेमंत पवार यांनी संयोजनात सहभाग घेतला. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड आणि आण्णा गुरव यांनी आभार मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button