दसरा मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून ११ हजार भाविक जाणार – सदाशिव खाडे


पिंपरी, पुणे (दि. १५ ऑक्टोबर २०२६) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या तीस वर्षापासून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बहुजन, वंचित आणि ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे समाज उपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी बहुजन, वंचित आणि शोषित घटकांचा आवाज बुलंद करण्याची परंपरा यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे. अन्यायग्रस्त वंचित व कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यंदाचा दसरा मेळावा मंगळवारी ( दि. २० ऑक्टोबर) लाखोंच्या संख्येने थोर संत राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट, तालुका पाटोदा येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र सह राजस्थान, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश व इतर राज्यातून राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भक्त आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड, पुणे शहरासह अकरा हजार अनुयायी उपस्थित राहणार असल्याची माहिती मेळाव्याचे समन्वयक व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

या मेळाव्याची नियोजन बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भगवान सेना प्रदेश पदाधिकारी पंचायत समिती सदस्य अशोक मुंडे, नगरसेवक अपूर्व खाडे, योगिता नागरगोजे, माजी उपमहापौर केशव घोळवे तसेच प्रा. रवी खेडकर, सुनील बांगर, दीपक नागरगोजे, अनंत कांदे, पवन जाधवर, डॉ. ज्ञानोबा मुंडे, कैलास केकाने, गणेश ढाकणे, कैलास सानप, भागवत मुंडे, रघुनंदन घुले, एस. नाकाडे, राहुल खाडे, राहुल नागरगोजे, रामदास कावळे, संजय बढे, डॉ. महेश गर्जे, बबन गर्जे, नामदेव सारुक, अण्णा गर्जे आदी उपस्थित होते.

“बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी” या संदर्भाचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतो. राष्ट्रसंत भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या थोर संतांचे त्यांच्या जन्मभूमी सावरगाव घाट, तालुका पाटोदा येथे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे हे स्मारक भगवान बाबांच्या महान कार्याची, विचारांची आणि समाज प्रबोधनाच्या परंपरेची आठवण करून देणारे प्रेरणास्थान आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा हे महान समाज प्रबोधनकार आणि युगपुरुष होते. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा आणि जातीभेद यांचे विरुद्ध त्यांनी आपल्या कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज जनजागृतीचे कार्य केले अशा महान राष्ट्रसंत भगवान बाबा यांना अभिवादन करण्यासाठी दसरा मेळाव्यात अभिवादन करण्यासाठी दसरा मेळाव्यात उपस्थित रहावे असे आवाहन सदाशिव खाडे यांनी केले आहे.
——————————————————————




