व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा – डॉ. कीर्ती धारवाडकर
एसबीपीआयएम मध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज "मीमांसा" चा समारोप


पिंपरी, पुणे (दि. १४ ऑक्टोबर २०२६) कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करण्यापूर्वी तरुण व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा. “मीमांसा” या राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज स्टडीज मध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येवर योग्य उपाय शोधण्यासाठी सखोल विचार कसा करावा याचे मार्गदर्शक मिळते. प्रत्येक केस स्टडी मध्ये नेहमी का, केव्हा, काय, कुठे, कोणाला हे पाच प्रश्न विचारले पाहिजेत त्यामुळे निरीक्षण शक्ती विकसित होते असे मार्गदर्शन एसबीपीआयएम च्या प्राचार्य डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॅम्पस मध्ये “मीमांसा २०२६” या राष्ट्रीय स्पर्धेची ऑफलाईन अंतिम फेरी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ. धारवाडकर बोलत होत्या. यापूर्वी ऑनलाइन पहिल्या फेरीत चार राज्यांमधील १८ संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४८ संघांनी सहभाग घेतला होता. त्या मूल्यमापनानंतर अंतिम फेरीसाठी १२ संघांची निवड करण्यात आली होती. या संघांमध्ये पुणे, बेंगळुरू, धुळे आणि संगमनेर येथील स्पर्धकांचा समावेश होता.

भारत फोर्जचे माजी संचालक डॉ. संतोष भावे, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे व उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी अंतिम फेरीचे मूल्यांकन केले. तर अंतर्गत तज्ज्ञ समितीमध्ये एसबीपीआयएम संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, संशोधन विभाग प्रमुख डॉ. भूषण परदेशी यांचा समावेश होता. तसेच यावेळी डॉ. रूपाली कुदरे, डॉ. शिवाजी देसाई, डॉ. अनिशकुमार कारिया, डॉ. काजल महेश्वरी आणि डॉ. संतोष शिंदे, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. दिलीप पवार, डॉ. योगेंद्र देवकर, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.

संघांनी प्रकल्प सादर करून विश्लेषणात्मक तर्क व आत्मविश्वासाने तज्ञांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. व्यवस्थापन शिक्षणातील विश्लेषणात्मक विचार आणि समस्या निवारणाच्या व्यावहारिक कौशल्यांचे महत्त्व मांडण्यात आले. तज्ञ समितीने कॉर्पोरेट नेतृत्व, मानव संसाधन, वित्त, विपणन, उच्च शिक्षण आणि व्यवस्थापन या क्षेत्रांतील विविध दृष्टिकोन याचे परीक्षण केले. तसेच ‘मार्केटिंग ३६०’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
“मीमांसा २०२६” या स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक :– कनक सांगळे आणि लक्ष धनानी, इंदिरा युनिव्हर्सिटी २० हजार रुपये; द्वितीय क्रमांक :– कृष्णा भवनानी आणि शिवानी ओझा, एसवीकेएम, एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटी, धुळे १५ हजार रुपये; तृतीय क्रमांक :– प्रणीत कुलकर्णी आणि मधुरम धनक, ॲमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल, १० हजार रुपये या विजेत्या संघांना धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र पारितोषिक व इतर सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजनात डॉ. संजय गायकवाड, डॉ. पद्मलोचन बिसोयी, डॉ. विशाल वाघ, डॉ. इराम अन्सारी यांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी आर्या सरदेशपांडे यांनी केले.
——————————————————————



