वंचितांच्या विकासासाठी उपाय शोधा – शेख दाऊद
एएसएम महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या उपक्रमाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपरी, पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२६) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी पारंपरिक चौकटी बाहेर विचार करून वंचितांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उपाय शोधावेत असे आवाहन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नात पुतणे आणि अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक सदस्य शेख दाऊद यांनी केले. डॉ. कलाम यांच्या विचारांचा अभ्यास करून सर्वांनी विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे असेही शेख दाऊद म्हणाले.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या (एएसएम) शैक्षणिक संकुलात आयोजित केलेल्या ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील ९० शाळा, २५२ महाविद्यालयातील १००० विद्यार्थी आणि २०० पेक्षा जास्त शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य, कृषी, हरित ऊर्जा आणि सामाजिक विकासाशी संबंधित १५० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. १०० पेक्षा अधिक शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी याचे परीक्षण केले. विजेत्या निवडक १०० विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश मधील विविध शाळा, महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते.

एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे हे स्वागताध्यक्ष होते. आयएएस अधिकारी हिरा लाल आयसर कोलकाता नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. सिन्हा, डॉ. एस. डी. गोकुळ, प्रा. मुरलीधर रेड्डी, डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देशमुख, स्टेम एक्सपर्टचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी फजलू रेहमान आदी उपस्थित होते.

स्वागत अध्यक्ष व एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे म्हणाले की, डॉ. कलाम यांचे विज्ञान हे शेतकऱ्यांसह देशातील प्रत्येक नागरिकांचे जीवन अधिक सुखकर होण्याच्या संबंधित होते. नव निर्मिती करताना मानव कल्याणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे हाच डॉ. कलाम यांच्या समाजाभिमुख वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खरा वारसा आहे असे डॉ. संदीप पाचपांडे यांनी सांगितले.
डॉ. अरविंद नातू यांनी सांगितले की, भविष्यातील उद्योग मानव केंद्रित, रोबोटिक्स सह पर्यावरणपूरक असतील. क्वांटम तंत्रज्ञान व बहु विद्याशाखीय संशोधनातून नव्या संधी निर्माण होतील. भारतीय संशोधकांना नोबेल पुरस्कार मिळणे, हीच डॉ. कलाम यांच्या स्वप्नाची खरी पूर्तता ठरेल.
डॉ. ए. के. सिन्हा यांनी डॉ. कलाम यांच्या आठवणी सांगितल्या. कायमस्वरूपी चुंबक विकसित करण्याच्या संशोधनासाठी कलाम यांनी प्रेरणा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
फजलू रेहमान यांनी सांगितले की, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी झाली पाहिजे असे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने कलाम स्ट्रीम चॅलेंज महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी एएसएमचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. दिलीप देशमुख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत डीआरडीओ मध्ये एकाच खोलीत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. कलाम सरांचे संपूर्ण लक्ष काम, संशोधन आणि नवकल्पनांवर असायचे. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची वृत्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा विद्यार्थ्यांसाठी आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय स्पर्धेत हरित ऊर्जा ते रोबोटिक्स अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६ मध्ये हरित ऊर्जा, सौरऊर्जा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्यसेवा, रोबोटिक्स, संरक्षण, सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक विकासाशी संबंधित १५० हून अधिक मॉडेल्स सादर करण्यात आली. या मॉडेल्सच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर कसा करता येईल, हे दाखवून दिले.
यावेळी ‘कलाम्स एंजल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तसेच डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘माय स्टोरी : मदर’ आणि मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कलाम कॉमिक’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. संजय गुप्ता यांचा शेख दाऊद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी आणि एएसएमचे मुख्य विपणन अधिकारी व प्रवेशप्रक्रिया आणि शैक्षणिक संपर्क विभागाचे संचालक जमीर मुल्ला यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. एएसएम ग्रुपचे आयपीएसचे संचालक डॉ. सुधाकर बोकफोडे, आयबीएमआरचे संचालक डॉ. व्ही. पी. पवार, डायरेक्टर जनरल डॉ. माथूर, टास्क फोर्सचे संचालक डॉ. डी. डी. बाळसराफ, डीन डॉ. विकास बरबटे, ग्रुप डायरेक्टर डॉ. मणिमाला पुरी, सीएसआयटीचे प्राचार्य डॉ. ललित कानोरे यांनी प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मिलिंद चौधरी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
——————————————————————




