पुणे एम्प्रेस गार्डन येथे शुक्रवार पासून पुष्प प्रदर्शन सुरू
पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना यावर्षीचे पुष्प प्रदर्शन समर्पित

पिंपरी, पुणे (दि. १९ जानेवारी २०२६) पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील “एम्प्रेस गार्डन भव्य पुष्प प्रदर्शन २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२३) जानेवारी, दुपारी १२ वाजता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती प्रदर्शन समिती अध्यक्ष सुमन किर्लोस्कर यांनी दिली आहे.

मंगळवार, दि.२७ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शनाची वेळ असून सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे.

यावर्षी हे प्रदर्शन ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रदर्शन समिती उपाध्यक्ष सुरेश पिंगळे यांनी दिली.

कै. डॉ. माधव गाडगीळ हे “ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया” या संस्थेचे मानद सदस्य होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्घाटनानंतर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात जपानी पद्धतीच्या (इकेबाना) कलात्मक पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष हे मुख्य आकर्षण ठरेल.
पुणे शहरासह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक सहभाग घेणार आहेत.
बागप्रेमींसाठी फुलांची मांडणी, फळे-भाजीपाला स्पर्धा आणि आकर्षक कुंड्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
१८३० पासून कार्यरत असलेली ‘ॲग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ ही संस्था एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन पाहते. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता, जनमानसात निसर्गाची ओढ आणि पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते.
सर्व निसर्ग आणि पुष्पप्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आणि डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
——————————————————————



