महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

चुकीच्या प्रचारप्रकरणी भाजपची कडक कारवाई

चेतन बेंद्रे व समीर जावळकर यांची भाजपा मधून हकालपट्टी

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ०७ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिस्तभंग आणि चुकीच्या प्रचाराविरोधात कठोर भूमिका घेत प्रभाग क्रमांक १५ मधील चेतन बेंद्रे आणि समीर जावळकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या अधिकृत निर्णयाविरोधात जाऊन दुसऱ्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणे, तसेच भाजपच्या नावावर चुकीचा प्रचार केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न सिताराम काटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

चेतन बेंद्रे आणि समीर जावळकर हे दोघेही प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपतर्फे इच्छुक उमेदवार होते. पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्ष आदेशानुसार त्यांनी माघार घेणे अपेक्षित असताना, दोघांनीही स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
याशिवाय, निवडणूक प्रचारादरम्यान दोघेही भारतीय जनता पक्षाच्या नावाचा वापर करून प्रचार करत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर बाबीची दखल घेत भाजपने दोघांवर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यांचे भाजप पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात आल्याने त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे असलेली संघटनात्मक पदेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत. नोटीस निर्गमित झाल्यापासून हा निर्णय तात्काळ लागू असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या दोघांकडून प्रभागात काही ठिकाणी भाजप शिवसेना युती असल्याचा तसेच आम्ही महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचेही पक्षाच्या निदर्शनास आले होते. प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्ष ही निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवीत असून शिवसेनेशी शहरात कोठेही युती नसल्याचे भाजपच्या वतीने ठामपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरातील भाजपचे सर्व अधिकृत उमेदवार कमळ या एकाच अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हेच भाजपचे अधिकृत उमेदवार असून, या चौघांचे अधिकृत निवडणूक चिन्ह कमळ हेच आहे, असेही भाजपचे प्रवक्ते कुणाल लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button