महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीय

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन

अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विषयी असलेली नाराजी दूर करून सर्वांचे मनोमिलन घडविण्यात माजी महापौर व महायुतीचे समन्वयक योगेश बहल यांना यश आले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर माजी नगरसेवक आणि उद्योजक यांच्या सोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली. त्यामुळे बहल यांच्या शिष्टाईला यश आले. यामुळे अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.

आमदार अण्णा बनसोडे संपर्कात राहत नाहीत असे सांगून पिंपरी कॅम्पातील व्यापारी तसेच माजी महापौर डब्बू आसवानी आदींनी त्यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी डब्बू आसवाणी यांची पिंपरीत येऊन भेट घेतली होती. त्या पाठोपाठ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डब्बू आसवाणी यांच्यासह सर्वांची मुंबईत बैठक घेऊन समेट घडवला. अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धती भविष्यात निश्चित सुधारणा दिसेल असा शब्द स्वतः अजित पवार यांनी दिला आणि हे मनोमिलन घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, उद्योजक श्रीचंद आसवानी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शितल शिंदे, काळूराम पवार आदी उपस्थित होते. यातील काळूराम पवार यांनीही अण्णा बनसोडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत बंडखोरी करून अर्ज भरला होता. मात्र काळूराम पवार यांच्यासह पिंपरी विधानसभा मतदारसंघातून एकूण १९ इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेऊन यापूर्वीच अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये मुख्यतः आरपीआयच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष व जेष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेकडून प्रबळ इच्छुक दावेदार माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, कामगार नेते बाबा कांबळे यांच्यासह इतर १९ उमेदवारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघार घेऊन अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला. पिंपरी कॅम्प परिसरात विशेष प्राबल्य असणारे माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि उद्योजक श्रीचंद आसवानी यांचा बनसोडे यांच्या उमेदवारीला तत्वता विरोध होता. हा विरोध ही संपवण्यात अजित पवार आणि योगेश बहल यांना यश आल्याने अण्णा बनसोडे यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे दिसते. आता अजितदादा पवार आणि आरपीआय सह महायुतीतील इतर सर्व घटक पक्षांनी अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती महायुतीचे समन्वयक व माजी महापौर, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button