आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघ विजयी
पीसीसीओई मध्ये बास्केटबॉल स्पर्धा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोबर २०२४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघाने विजेतेपद पटकावले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (दि. १४ व १५ ऑक्टोबर) येथे झालेल्या या मुलींच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा या चार संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झाली होती. या स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात आल्या.
अंतिम सामन्यात पुणे शहर संघाने व पुणे जिल्हा संघावर ३६ विरुद्ध २२ या गुणफरकाने विजय मिळवला. सिया खिलारे, मानसी निर्मलकर, चैतन्या रोळे यांच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर पुणे शहर संघाने तीनही सामने जिंकून विजेतेपद पटकावले. तसेच सृष्टी लंगोट, पूर्वा भिरुड, संपदा सावंत, समीक्षा पाटील यांच्या उत्कृष्ठ खेळामुळे पुणे जिल्हा संघ दोन सामने जिंकून द्वितीय स्थानी राहिला.
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डिन एचडी डब्ल्यू डॉ.पद्माकर देशमुख, विद्यापीठ प्रतिनिधी किशोर घडीयार, निवड समिती अध्यक्ष प्रा. शैलेंद्र कांबळे, सदस्य प्रा. आशिष तळेकर, अर्जुन मेहता आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी केले.
यशस्वी संघांचे व स्पर्धकांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.