एसबीपीआयएम ने नॅकचे ए प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा विश्वस्तांच्या हस्ते सत्कार
पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोंबर २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. हे मानांकन मिळणे म्हणजे पीसीईटीच्या विश्वस्तांनी एसबीपीआयएमच्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे. त्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, समन्वयक डॉ. अमरीश पद्मा व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले की, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. संस्थेने नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एनबीए) मानांकन या पूर्वी पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ‘ए प्लस’ ही श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या दुसऱ्याच फेरीत प्राप्त केली आहे. शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर संस्थेची वाटचाल सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्वांगीण विकासावर महाविद्यालय भर देत असल्याने ‘नॅक’च्या परीक्षणात यश मिळणे ही त्याची पावती आहे. सर्व विश्वस्तांचे सहकार्य आणि अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे योगदान यामुळे हे मानांकन प्राप्त झाले. येथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे व्यवस्थापन शाखेला प्रवेश घेताना विद्यार्थी व पालक नेहमीच एसबीआयएमला प्राधान्य देतात.