स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईच्या टीम अनुर्वेदने पटकावला प्रथम क्रमांक
पिंपरी, पुणे (दि. १८ डिसेंबर २०२४) आयआयटी गांधीनगर, गुजरात येथे केंद्र सरकार द्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईच्या टीम अनुर्वेदने पटकावला प्रथम क्रमांक पटकावून एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले.
देशातील अग्रमानांकित इंजिनिअरिंग कॉलेजपैकी एक असणाऱ्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) टीम अनुर्वेदने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच २०२४) सॉफ्टवेअर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून रुपये १ लाखाचे पारितोषिक पटकावले. भारतात वेगाने विस्तारणाऱ्या शहरांमध्ये परस्पर समन्वय आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरणारे प्रकल्पाचे नियोजन, प्रकल्पाचे टप्पे ठरविणे, शहरा शहरांमधील समन्वय वाढवण्यासाठी डेटा हस्तांतर करून विविध विभागांमध्ये प्रशासनाचा कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी टीम अनुर्वेदने नवीन विकसित केलेल्या संगणक प्रणालीचे सादरीकरण या स्पर्धेत केले होते.
टीम अनुर्वेद मध्ये प्रसाद अजय महांकाळ (टीम लीडर), आशिष गोविंद सूर्यवंशी, प्रणव विलास पाटील, सिद्धेश अरुण पाटील, पायल सुनील पवार, पवन राजेश पाटील यांचा समावेश होता, डॉ. पंकज रंगराव माळी यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संगणक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सोनाली पाटील, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.