रतन टाटा यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे – प्रवीण तुपे
रतन टाटा यांना सायन्स पार्कमध्ये श्रद्धांजली अर्पण
पिंपरी, पुणे (दि. १२ ऑक्टोबर २०२४) पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली. मेट्रो सिटी असा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडचे नाव घेतले जाते. यामधे उद्योगपती रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी केले.
भारताच्या उद्योग जगताचे पितामह पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. पुणे, पिंपरी चिंचवड शहर व रतन टाटा यांचे भावनिक स्नेह संबंध होते. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चिंचवड, सायन्स पार्क येथे शुक्रवारी, (दि. ११) आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत तुपे बोलत होते.
यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी नगरसेवक मारुती भापकर, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे संचालक बाळासाहेब शेंडगे, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अनिल राऊत, मरकळ इंडस्ट्रियल असोसिएशनचे देशपांडे, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, मल्लप्पा कस्तुरे, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग गवळी, उद्योजक प्रमोद राणे, सायन्स पार्कचे कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार, सहाय्यक शिक्षणाधिकारी सुनील पोटे, विज्ञान अधिकारी सोनल थोरवे, अस्मिता सावंत, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन व धानोरे येथील इंद्रायणी इंडस्ट्रियल तसेच सायन्स पार्कशी सहयोगी विविध संस्थांचे प्रतिनिधी व परिसरातील उद्योजक, कामगार उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना तुपे म्हणाले की, रतन टाटा यांचा परिसस्पर्श विविध सामाजिक ट्रस्ट, शैक्षणिक व संशोधन संस्था, संघटनांना लाभला आहे. पिंपरी चिंचवड मनपा निर्मित सायन्स पार्कच्या निर्मितीतीत टाटा यांचे उल्लेखनीय योगदान आहे. यामध्ये विविध प्रदर्शन कक्षांच्या, विशेषतः ऑटोमोबाईल या कक्षाच्या जडणघडणीत टाटा मोटर्सचे, तसेच कल्पकघर या आयसर पुणे व सायन्स पार्कच्या संयुक्त उपक्रमास टाटा टेक्नोलॉजीज यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. रतन टाटा यांनी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या माध्यमातून सायन्स पार्क येथे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन कक्ष प्रेक्षकांसाठी उभारला आहे. येथे दरवर्षी तीन लाखाहून जास्त विद्यार्थी भेट देण्यासाठी येतात. ‘सॉल्ट ते सॉफ्टवेअर’ अशा सर्व क्षेत्रात टाटाचे नाव उंचावण्यासाठी रतन टाटा यांचे योगदान आहे. देश प्रेमाबरोबरच आपल्या कामगारांवरही त्यांनी कुटुंब प्रमाणे प्रेम केले. सर्व घटकांनी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड या कामगार नगरीचा आणखी वेगाने विस्तार करून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच रतन टाटा यांना आदरांजली ठरेल असे तुपे म्हणाले.
संदीप बेलसरे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, टाटा मोटर्सने पिंपरी चिंचवड व परिसरात अनेक उद्योजक घडवले. त्यांच्यामुळेच पिंपरी चिंचवड व परिसरात लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसेच मध्यम उद्योगांना चालना मिळाली. रतन टाटा यांनी निवृत्तीनंतरही तरुण उद्योजकांना स्टार्ट अप साठी पाठबळ दिले. सीएसआर फंडातून देखील त्यांनी मावळ, मुळशी सह अनेक दुर्गम भागात प्राथमिक सेवा, सुविधा देण्यात हातभार लावला.
बाळासाहेब शेंडगे यांनी सांगितले की, टाटा मोटर्स पिंपरी आणि चिंचवड मध्ये असले तरी शहराच्या बाहेर असणाऱ्या चाकण, धानोरी, मरकळ, जेजुरी, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यात देखील टाटा मोटर्स मुळे रोजगार निर्मितीस चालना मिळाली. मारुती भापकर, नंदकुमार कासार, पांडुरंग गवळी यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.