विकसित भारत ध्येय साध्य करण्यासाठी संशोधनाला महत्त्व – डॉ. हर्षवर्धन पोल
क्षितिज अंतर्गत पीसीसीओई येथे पेटंट अनुकूल नवकल्पनांचे प्रदर्शन, उद्योग आणि शैक्षणिक संस्था संबंध दृढ करण्यासाठी पीसीसीओईचा पुढाकार


पिंपरी, पुणे (दि. १८ मे २०२६) “२०४७ विकसित भारत” हे ध्येय साध्य करण्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधनाला खूप महत्त्व आहे. त्यासाठी भारतीय अभियंत्यांनी संशोधन क्षेत्रात प्रयत्नपूर्वक आंतर विद्याशाखीय सहकार्याने स्वदेशी नवोपक्रम राबविले पाहिजेत असे आवाहन सीएसआयआर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन पोल यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘क्षितिज २०२६’ अंतर्गत पाचव्या ‘इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट शोकेस कॉन्फरन्स’चे उद्घाटन डॉ. पोल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईचे उप संचालक डॉ. निळकंठ चोपडे, डसॉल्ट सिस्टीम कंपनीचे आकृती ग्लोबल कोअर टीम लीडर अनिकेत भांगे, क्षितिज २०२६ चे संयोजक डॉ. राहुल गुजर, डॉ. श्रीनिवास अंबाला, समन्वयक डॉ. रजनी पि. के. आदींसह राज्यभरातील नामांकित कंपनीमधील १५५ उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सहभागी संशोधकांनी नाविन्यपूर्ण उद्योगाभिमुख पेटंट योग्य २६ प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये मशीन लर्निंग, डेटा सायन्स, स्ट्रक्चरल हेल्थ, सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, हेल्थकेअर, सिस्टीम इंजिनिअरिंग आणि स्मार्ट चिप यांसारख्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रांचा समावेश होता.
पीसीईटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डसॉल्ट सिस्टीम कंपनीचे ग्लोबल टीम लीडर अनिकेत भांगे यांनी सांगितले की, संशोधनातून आलेली कोणतीही नवकल्पना ही प्रतिकूल नसते, तिची अंमलबजावणी तसेच तिचे आवश्यक आणि परिणामकारक उत्पादनांमध्ये रूपांतर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी क्षितिज २०२६ हे उपयोजित अभियांत्रिकी, वास्तविक समस्यांचे निराकरण आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ ठरले आहे. यामुळे उद्योग प्रतिनिधींच्या सहभागातून उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत होईल.
स्वागत डॉ. रजनी पि. के., सूत्र संचालन डॉ. राहुल गुजर आणि आभार डॉ. श्रीनिवास अंबाला यांनी मानले.
——————————————————————



