मनपाच्या सर्व रुग्णालयात बील भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा द्या – रवींद्र ओव्हाळ


पिंपरी, पुणे (दि. १७ जुलै २०२६) स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, इ गव्हर्नन्स प्रशासन असा बडेजाव मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला अद्यापही शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह इतर रुग्णालयात बिल भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयश आले आहे. रुग्ण व नातेवाईकांच्या सुविधेसाठी वायसीएम रुग्णालय सह सर्व रुग्णालय व ओपीडी मध्ये बिल भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झोपडपट्टी सेल शहर अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवी लांडगे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दोन दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयात केस पेपर काढताना एका ज्येष्ठ नागरिकाचा आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्याचा सुट्ट्या पैशांवरून वाद झाला. या व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचाऱ्याचा उद्धटपणा दिसत आहे. असे प्रकार बहुतांशी सर्वच रुग्णालयात वारंवार घडत आहेत. रुग्णालयात केस पेपर काढणे आणि बिल भरणे यासाठी बहुतांश ठिकाणी ठेकेदारामार्फत कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यावर रुग्णालयीन प्रशासनाचे व कोणाचेच नियंत्रण नाही, त्यामुळे ते असे उद्धटपणे नागरिकांची वाद घालत असतात. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणाऱ्या पीएमपी मध्ये आणि मेट्रोमध्ये देखील ऑनलाईन तिकीट काढता येते. मिळकत कर देखील ऑनलाईन भरता येतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार च्या अनेक आस्थापना देखील अनेक विभागांचे कर ऑनलाईन स्वीकारत आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेमध्ये ऑनलाइन बिल भरण्याची सेवा का उपलब्ध करून दिली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आहे. ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झोपडपट्टी सेल शहर अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी दिला आहे.
——————————————————————



