पारंपरिक कामगार कायद्यांसाठी वज्रमूठ – डॉ. कैलास कदम
कामगार दिनानिमित्त पिंपरीत इंटक ची दुचाकी रॅली

पिंपरी, पुणे (दि. ३ मे २०२६) केंद्र सरकारने पारंपरिक कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांच्या फायद्यासाठी नवीन कायदे आणले आहेत. यामुळे कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण होणार आहे. हे काळे कायदे मागे घेऊन पारंपरिक कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व कामगारांनी वज्रमूठ करावी असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष व इंटक पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

जागतिक कामगार दिनानिमित्त इंटक कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१ मे) सकाळी भक्ती शक्ती चौक ते पिंपरी पर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कामगारांना डॉ. कैलास कदम यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुणे जिल्हा ग्रामीण इंटक अध्यक्ष विजय जाधव, इंटक पुणे जिल्हा महिला शहराध्यक्ष शितल कोतवाल, खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीचे शशिकांत धुमाळ, विजय पाटील, विजय कदम, एल. जी. इलेक्ट्रॉनिक्सचे संतोष खेडेकर, विकास साखरे, हायर कंपनीचे विकास साखरे यांनी देखील उपस्थित कामगारांशी संवाद साधला. यावेळी पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तळेगाव, शिरूर, रांजणगाव, सणसवाडी, चाकण, खेड, म्हाळुंगे, भोर, जेजुरी, बारामती, कुरकुंभ, दौंड भागातील इंटक, हिंद कामगार संघटना आणि कामगार संघटना संयुक समितीचे सदस्य रॅली मध्ये सहभागी झाले होते. डॉ. कदम यांनी कामगारांना जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात राव बहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांना कामाचे तास, आठवड्यात एक दिवस रजा, किमान वेतन व इतर हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला. देशातील पहिल्या कामगार संघटनेची स्थापना त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर आता पर्यंत देशात शेती व औद्योगिक क्रांती झाली. देश आर्थिक प्रगती करू लागला. आज भारत देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाच मध्ये आहे. याचे सर्व श्रेय कामगारांचे आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी “इंटक” या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कामगार संघटनेची स्थापना केली. कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना नेहमी अग्रेसर राहिली आहे. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक वेळा देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन देशभर काम बंद करून निदर्शने, आंदोलने केली आहेत. आता पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. यासाठी आता वेळ प्रसंगी सर्व कामगारांनी, संघटनांनी या नवीन काळया कामगार कायद्या विरोधात वज्रमूठ करून कामगारांच्या एकीचे दर्शन घडवावे असे आवाहन डॉ. कैलास कदम यांनी केले.
स्वागत शांताराम कदम, आभार यशवंत सुपेकर यांनी मानले.
——————————————————————–



