काँग्रेस पक्ष पुनर्बांधणी साठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी
शहराध्यक्षपदासह इतर पदांच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू

पिंपरी, पुणे (दि. ९ एप्रिल २०२६) काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणी साठी बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदांसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे. या अभियानाचा अहवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सादर करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी यांनी दिली.

गुरुवारी (दि. ९) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुलतानपूरी बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव दाहर मुजावर, आमदार जयंत आजगावकर, निरीक्षक आनंद सिंग, एआयसीसी सचिव पृथ्वीराज साठे, निरीक्षक भानुदास माळी, सचिव मनोज कांबळे, बाबू नायर, कौस्तुभ नवले, सायली नढे आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे स्वागत प्रास्ताविक मयूर जयस्वाल यांनी केले.

यावेळी विनोद सुलतानपुरी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड जिल्हास्तरावर काँग्रेस संघटन पातळीवर कमकुवत आहे याची आम्हाला जाणीव आहे. आजच्या बैठकीत सर्वांनी आपली मते निसंकोचपणे व्यक्त केली. या अगोदर मोठ्या निर्णयासाठी येथील कार्यकर्त्यांना मुंबईत जायला लागत होते, परंतु आता स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून येथेच निर्णय होतील. शहराध्यक्ष पदासाठी सुमारे ३५ लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. ब्लॉक अध्यक्ष तसेच इतर पदांसाठी देखील इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
एआयसीसी सचिव पृथ्वीराज साठे यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष ‘संघटन बांधणीचे वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. महाराष्ट्रातहि ‘संघटन सृजन अभियान’ जोमाने सुरू झाले आहे. हे अभियान म्हणजे काँग्रेसला तळागाळातून मजबूत करण्याचा संकल्प आहे.
निरीक्षक भानुदास माळी यांनी सांगितले की, अभियानाचा पाहिला टप्पा म्हणजे जिल्हा व ब्लॉक स्तरावर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग, भटक्या विमुक्त जमाती विभाग, सोशल मीडिया विभाग पदांसाठी निरीक्षक शिफारस करतील. या सर्व पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक समतोल राखला जाईल. प्रत्येक ब्लॉक विषयी निरीक्षक कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत त्यांचे म्हणणे समजून घेऊन तेथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून निरीक्षक आपल्या शिफारशी व अहवाल प्रदेश आणि राष्ट्रीय काँग्रेसला सादर करणार आहे. संघटनेची खरी ताकद आता बूथ आणि वॉर्ड अध्यक्षांच्या हातात असेल. सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे काँग्रेसचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट आहे. यामुळे पुढच्या काळात शिस्तबद्ध संघटन हीच काँग्रेसची खरी ओळख ठरेल असे भानुदास माळी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत नेवाळे, अमर नाणेकर, डॉ. मनिषा गरुड, गिरिजा कुदळे, शीतल कोतवाल, नरेंद्र बनसोडे, विठ्ठल शिंदे, गौरव चौधरी, मकरध्वज यादव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————-



