कष्टकरी जनता व कामगारांचा भाजपला पाठिंबा – बाबा कांबळे

पिंपरी, पुणे (दि. ०९ जानेवारी २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अजित दादा पवार यांनी कष्टकरी कामगारांचा, दुर्बल घटकांचा विश्वासघात केला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुका सुरू आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरासह सर्व राज्यातील महानगरपालिकेतील भाजपच्या उमेदवारांना कष्टकरी कामगारांनी मतदान करावे आणि कष्टकऱ्यांचा अपमान करणारे अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यावी असे कामगार नेते डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले. पिंपरी येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बाबा कांबळे बोलत होते.

यावेळी आमदार महेशदादा लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपा दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजप शहर प्रवक्ते कुणाल लांडगे, भाजप शहर सरचिटणीस वैशाली खाड्ड्ये, मधुकर बच्चे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, पिंपरी चिंचवड मनपा फेरीवाले समिती सदस्य आशा कांबळे, कष्टकरी जनता आघाडी सरचिटणीस मधुरा डांगे, बांधकाम मजूर संघटना उपाध्यक्ष शितल भडंगे, घरकाम संघटना महिला सचिव अनिता काजळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सरचिटणीस प्रकाश यशवंते आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, मी गेली २५ वर्षे ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेरीवाले टपरी पथारी हातगाडी धारक फळभाजी विक्रेते बांधकाम मजूर साफसफाई कामगार महिला धुणी भांडी स्वयंपाक करणाऱ्या महिला हमाल ट्रक टेम्पो बस कंटेनर डंपर क्रेन चालक मालक आणि असंघटित कामगार कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांचे नेतृत्व करत आहे.

मी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून देखील माघार घेऊन आमदारांना अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कष्टकरी कामगारांना दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण केली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कष्टकरी कामगारांसोबत विश्वासघात केला. त्यांना आता जागा दाखवली पाहिजे. या निवडणुकीत कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी शब्द दिला होता. मला इच्छा नसताना त्यांनी अर्ज भरायला लावला आणि अचानक आमदार आण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना उमेदवारी दिली. मी अजित दादांना याबाबत विचारणा केली. आमच्या महिला भगिनींनी देखील त्यांना विनंती केली. परंतु मला डावलण्यात आले. आमदार अण्णा बनसोडे यांना निवडून आणण्यात वेळ घालवला आता त्यांच्या मुलाला निवडून आणण्यासाठी काम करायचे हे माझ्या तत्वात बसत नाही हा कष्टकरी जनता कामगारांच्या स्वाभिमानाला धक्का आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोकसंख्या सात ते आठ लाख असंघटित कष्टकरी कामगारांची आहे. सुमारे ४५ हजार रिक्षा चालक मालक आहेत.

मी संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालक महामंडळ स्थापन करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. युती सरकारच्या काळात रिक्षा चालक महामंडळ ची स्थापना केली. फेरीवाल्यांचा कायदा २००७ मध्ये प्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे प्रश्न कायम प्रलंबित ठेवले.
आम्हाला आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावर विश्वास वाटतो, त्यामुळे महानगरपालिका मधील सर्व भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कष्टकरी कामगारांचा पाठिंबा आहे.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करू नये. राष्ट्रवादी हा पक्ष गरिबांचा कष्टकऱ्यांचा नाही. देशात ४५ कोटी असंघटित कष्टकरी कामगार आहेत. यांचा प्रथम विचार अटल बिहारी वाजपेयी यांनी केला. या लोकांना पेन्शन मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. महाराष्ट्रात तीन कोटी संगणक कामगारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंडळ स्थापन केले. कष्टकऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न देखील भाजपा सोडवेल याचा आम्हाला विश्वास आहे.
आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे हे त्या प्रभागात राहत नाही. अण्णा बनसोडे यांना निवडून आणले आता त्यांच्या मुलाला निवडून आणा असे अजित दादांनी सांगितले. हा आमचा अपमान आहे. आमदार महेश दादा लांडगे आणि भाजप कष्टकऱ्यांचा सन्मान करते. युती काळात पहिल्यांदा रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ झाले. आता जास्तीत जास्त मतदान करून भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करू नये असे आम्ही आवाहन कामगार नेते बाबा कांबळे यांनी नागरिकांना केले.
——————————————————————



