महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धे विरुद्ध उभारलेली राष्ट्रवादी चळवळ – स्वामी सच्चिदानंद

आर्य समाज पिंपरी संस्थेच्या अमृत महोत्सवाची सांगता

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २१ डिसेंबर २०२६) महर्षी दयानंद सरस्वती यांनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला आर्य समाज म्हणजे तत्कालीन काळात असणाऱ्या अंधश्रद्धे विरुद्ध सुरू केलेली एक राष्ट्रवादी चळवळ आहे. त्यांनी देशातील पहिली गोशाळा हरियाणामध्ये सुरू केली. ब्रिटिश सरकारने मीठ करमुक्त करावे यासाठी सर्वप्रथम महर्षी दयानंद सरस्वती यांनी सह्यांची मोहीम राबविली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आर्य समाजाचे उल्लेखनीय योगदान आहे, असे प्रतिपादन जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांनी केले.

पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन व अमृतसर पंजाब येथील पंडित दिनेश आर्य यांचे भजन, यज्ञ हवन, पुरस्कार वितरण, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. समारोपाच्या दिवशी रविवारी, आर्य समाज चळवळीत विशेष योगदान देणारे उत्तम दंडीमे, शकुंतला दंडीमे, लक्ष्मी कलबुर्गी, रमेश वासवानी, वीणा वासवानी, रमेश धर्माणी, मीना धर्माणी, श्रुत चव्हाण, शुभलता चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी “राष्ट्र निर्माण मे हमारे कर्तव्य” या विषयावर स्वामी सच्चिदानंद यांनी प्रवचन दिले. पंडित दिनेश आर्य यांनी सुश्राव्य वाणीमध्ये भजन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी डॉ. दि. मा. मोरे, पिंपरी संस्थेचे मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सचिव हरेश तिलोकचंदानी, अतुल आचार्य, दिनेश यादव, उत्तम दंडीमे, जयराम धर्मदासानी, दिगंबर रिद्धीवाडे, संजय वासवानी आदी उपस्थित होते.

स्वामी सच्चिदानंद यांनी सांगितले की, सध्या तरुण पिढीमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिप याचे प्रमाण वाढत आहे, ही पद्धत आपल्या संस्कृतीवर आक्रमण करणारी आहे. यामधून जन्मणारी मुले, मुली पुढे बेवारस म्हणून ओळखली जातील हे रोखले पाहिजे. आर्य समाज अंधश्रद्धेचा तिरस्कार आणि महिला व दलितांचा सन्मान, स्वदेशीचा पुरस्कार करणारी एक राष्ट्रवादी चळवळ आहे. विधवा विवाहास प्रोत्साहन महर्षी दयानंद सरस्वती यांनी दिले. बेवारस मुलांसाठी देशातील पहिले अनाथालय फिरोजपुर येथे त्यांनी स्थापन केले. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना आर्य समाजाने केली, तसेच या चळवळीतील बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी बडोदा बँकेची स्थापना केली. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले ८५ टक्के क्रांतिकारी महर्षी दयानंद यांचे मानसपुत्र होते. नीरा आर्या ही आर्य समाज चळवळीतील देशातील पहिली गुप्तहेर महिला होती, तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रक्षणासाठी ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी असलेला तिचा पती प्रियरंजन दास याला गोळ्या घालून ठार केले होते अशी माहिती स्वामी सच्चिदानंद यांनी दिली.

महोत्सव अंतर्गत शुक्रवारी (दि.१९) पिंपरी कॅम्प येथील संस्थेच्या पटांगणात सकाळी आणि सायंकाळी होम हवन, भजन करण्यात आले. शनिवारी (दि. २०) सायंकाळी, पिंपरी, आचार्य अत्रे नाट्यगृह येथे स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन झाले. रविवारी (दि. २१) सकाळी संस्थेच्या आवारात २५ कुंडी यज्ञ करण्यात आला. आर्य वीर दल पिंपरी च्या वतीने “हुतात्मा स्वामी श्रद्धानंद बलिदान दिवस” निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता. पिंपरी चिंचवड मनपाचे निवृत्त कर्मचारी अतुल आचार्य यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी ६५ वे रक्तदान केले. त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संकलित झालेल्या १०८ पिशव्या संजीवनी रक्तपेढीस देण्यात आल्या. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास भेट देण्यात आली. यज्ञ ब्रम्हा पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मयज्ञ व देवयज्ञ करण्यात आले. महाप्रसादाने समारोप करण्यात आला. आर्य समाजाचे कार्य करणारे हेमदेव थापर, साईनाथ पुण्णे, विवेक आर्य, ऋषिपाल आर्य, गणेश देव आर्य यांचा सत्कार करण्यात आला. हर्ष भोंडेले यांनी हनुमान गदा आणि मुद्गल यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

स्वागत सुरेंद्र करमचंदानी, प्रास्ताविक दिनेश यादव, सूत्र संचालन पल्लवी आमटे, आभार नलिनी देशपांडे यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button