महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराजकीयराष्ट्रीयसामाजिक

मराठी पाऊल पडते पुढे… भार्गव रत्नकांत जगतापची यशोगाथा

ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर यांच्या कडून

Spread the love

पिंपरी, पुणे – दिल्लीतील विज्ञान भवनात २३ सप्टेंबर २०२५ रोजी दिमाखदार असा ७१ वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळा संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील विविध मान्यवर कलाकार, तंत्रज्ञांना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या सोहळ्यात मराठमोळ्या भार्गव रत्नकांत जगतापची यशोगाथा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

‘आटपाट प्रॉडक्शन’ व ‘झी स्टुडिओज’ निर्मित आणि सुधाकर रेड्डी येक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ या मराठी चित्रपटासाठी भार्गव जगताप याला ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा’ अशी भावना बाळगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी हा क्षण खऱ्या अर्थाने सन्मानाचा होता.

अनपेक्षित पण सुवर्णक्षण

आपल्या कामाचे कौतुक व्हावे, त्यावर मान्यताप्राप्त पुरस्काराची मोहोर उमटावी, असे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असते. परंतू, हे स्वप्न आहे आणि ते पूर्णत्वास न्यायचे आहे, असं काहीही ध्यानीमनी नसताना एका बालकलाकाराच्या आयुष्यात अनपेक्षितपणे सुवर्णक्षण आला. तो कलाकार म्हणजे भार्गव रत्नकांत जगताप. गेली अनेक वर्षे मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीत अहोरात्र कार्यरत असणारे रत्नकांत जगताप यांचा भार्गव हा धाकटा मुलगा. मूळचे सातारा येथील सोनकी गावचे रहिवाशी असलेले रत्नकांत जगताप जन्मापासून मुंबईकर आहेत. २००५ पासून ते नाट्य – चित्रपटसृष्टीशी जोडले गेले. सद्यस्थितीत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य अशा विविध माध्यमातून ते कार्यरत आहेत. नाटक क्षेत्रात ‘मालक’ या टोपणनावाने त्यांची ओळख आहे.

भार्गवचा जन्म मुंबईत १२ मार्च २००७ रोजी झाला. २०२३ मध्ये तो एन.आय.ओ.एस. बोर्डमधून दहावी उत्तीर्ण झाला. सध्या तो ग्लोबल लर्निंग ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी शिक्षण घेत आहे.

‘ नाळ २’ या मराठी चित्रपटातून भार्गवने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण त्याने घेतलेले नाही. लहानपणापासूनच बोलताना आणि लिहिताना त्याला अडचणी जाणवतात. त्यामुळे चित्रपटक्षेत्रात तो येईल, अशी कोणतीही शक्यता नव्हती.

भार्गव आठवीत असताना ‘नाळ २’ साठी ऑडिशन्स सुरू होत्या. त्यात ‘मनी’ या पात्रासाठी प्राथमिक स्तरावर त्याची निवड झाली. पुढे अधिकृतपणे शिक्कामोर्तबही झाले. चित्रपटाशी संबंधित कार्यशाळेत तो गेला आणि तेथूनच शूटींगला रवाना झाला. भार्गव हा चित्रपटात काम करतोय, याविषयी फारसे कोणाला माहिती नव्हते. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्यावर तो झळकला. तेव्हापासून सर्वांना माहिती होऊ लागली.

पहिलाच सिनेमा असतानाही त्याने ‘नाळ २’ मधील भूमिका अप्रतिम सहजता दाखवत चांगलीच वठवली. त्याच्या कामाचे प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. अनेक पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – सांस्कृतिक कलादर्पण गौरव (२०२४), विशेष उल्लेखनीय, महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२०२५) आणि बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोवा (२०२४) असे त्यातील मानाचे काही टप्पे आहेत. याखेरीज, सातारा भूषण (२०२४) आणि बाल रंगभूमी परिषद पुरस्कार (२०२४-२५) तसेच सर्वोत्कृष्ट बाल कलाकार नामांकन – झी गौरव (२०२४) या पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराने भार्गवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

मल्याळी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार मोहनलाल, हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘किंग’ शाहरूख खानसह राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांसारख्या दिग्गजांसमवेत भार्गवला राष्ट्रीय पुरस्कारासाठी गौरवण्यात आले. शाहरूख खानने भार्गवच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्याला मिठी मारली, हे क्षण डोळ्यांच साठवून ठेवावेत, असेच होते.

भार्गवची यशस्वी घोडदौड यापुढेही अशीच कायम सुरू राहणार, याविषयी कोणाच्या मनात शंका असणार नाही. लवकरच महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमातही तो झळकणार आहे.

भार्गवची ही यशोगाथा केवळ एका बालकलाकाराची नसून मराठी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर पोहोचवण्याच्या दृष्टीने पडलेले महत्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

…हा तर अविस्मरणीय क्षण

पडद्यामागे सूत्रधार म्हणून काम करताना रजत पडद्यावर झळकण्याचा मोह मलाही झाला होताच. नंतर मात्र या क्षेत्रात फारसे भवितव्य आहे, असे वाटले नाही. किंबहुणा, त्या तुलनेत इतर विभागात आपल्या कौशल्याला अधिक वाव मिळू शकतो, असे लक्षात आल्याने तिकडेच लक्ष केंद्रित केले. भार्गवने माझं ते स्वप्न खरं करून दाखवलं. महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते भार्गवला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना पाहणं हा क्षण अभिमानास्पद होता. आपल्या मुलांचं अशाप्रकारे कौतुक होणं आणि त्याचा साक्षीदार होता येणं हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, ते माझ्या होतं. आम्हा सगळ्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता, इतकंच म्हणता येईल.

– रत्नकांत जगताप, कार्यकारी निर्माता.

—————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button