महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

कोरियन प्रगती अभ्यासण्याची विद्यार्थ्यांना संधी – यू डोंगवान

कोस्मे सोबत सहकार्य करणारे पीसीयू पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ - हर्षवर्धन पाटील, पीसीयू–कोस्मे शैक्षणिक सामंजस्य करार

Spread the love

पिंपरी पुणे (दि. ३० सप्टेंबर २०२५) – दक्षिण कोरियाने शैक्षणिक, तांत्रिक, औद्योगिक प्रगती केली आहे. कोस्मे – पीसीयू यांच्या मध्ये झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना हे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पीसीयू व दक्षिण कोरिया यांच्यातील विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांना चालना दिली जाईल. कोरियन भाषा शिक्षण सुरू करण्यासाठी सहाय्य करून दक्षिण कोरियातील विद्यापीठांशी थेट संवाद साधण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. पीसीयू आणि दक्षिण कोरिया शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्यात येईल, असे प्रतिपादन दक्षिण कोरियाचे वाणिज्य दूत यू डोंगवान यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि दक्षिण कोरियाच्या कोरियन एसएमई (कोस्मे) यांच्या मध्ये सोमवारी (२९ सप्टेंबर) पीसीयू साते मावळ येथे सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात कोरिया फॅसिलिटेशन सेंटरचे तसेच कोस्मे ट्रेनिंग प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोस्मेचे चेअरमन जे क्युंग ली, पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री व नुतन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू अभ्यास मंडळ सदस्य सचिन इटकर, पीसीयूचे प्रभारी कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पीसीयू उद्योग संस्था संवाद संचालक डॉ. प्रणव चारखा आदी उपस्थित होते.

जे क्युंग ली म्हणाले, या सहकार्यामुळे विद्यार्थी व तरुणांना कोरियन एसएमई सोबत प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध होतील. तसेच कोरियन एसएमईंना महाराष्ट्रात विस्तारासाठी मार्गदर्शन, कार्यालयीन सुविधा व कायदेशीर सहाय्य, भारत व कोरिया येथील स्टार्टअप्सना विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य मिळेल. सांस्कृतिक आदान प्रदानामुळे परस्पर समन्वय वाढेल आणि दीर्घकालीन भागीदारीस चालना मिळेल.

महाराष्ट्राला २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. या करारामुळे तरुणांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, संशोधन आणि औद्योगिक संधी मिळणार असून हे ध्येय साध्य करण्यासाठी हा करार नक्कीच प्रेरक ठरेल. पीसीयू हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ असून कोस्मेसोबत ऐतिहासिक करार केला ही अभिमानास्पद बाब आहे. अशा आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे पीसीयूच्या विद्यार्थ्यांना कोरियन कंपन्यांमध्ये संधी मिळतील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

कोस्मेच्या जागतिक प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमांचा लाभ पीसीयूच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोरियन कंपन्यांमध्ये इंटर्नशिप, प्लेसमेंट व उच्च शिक्षणाच्या संधी, संयुक्त संशोधन उपक्रम, भविष्यकालीन क्षेत्रांमध्ये एआय, इव्ही, सेमीकंडक्टर व बायोटेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात संधी मिळणार आहेत, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.

यावेळी पीसीयू कोरिया फॅसिलिटेशन सेंटर मुख्य सल्लागार व सीईओ, स्टारजिनच्या युजिन हान यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या नावीन्यपूर्ण उद्योग व्यवस्थेची ओळख करून देत या केंद्रामुळे भारतीय विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनं, सेमीकंडक्टर, आयटी व अत्याधुनिक उत्पादन क्षेत्रात संधी उपलब्ध होणार असल्याचे युजीन हान यांनी सांगितले.

खेड, तळेगाव, चाकण परिसरात अनेक कोरियन कंपनी आहेत. हा परिसर उद्योगांचा केंद्रबिंदू झाला आहे. कोरिया फॅसिलिटेशन सेंटरच्या स्थापनेमुळे भारत–कोरिया औद्योगिक सहकार्य अधिक बळकट होईल, असे सचिन इटकरे म्हणाले.

डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. सुदीप थेपडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या केंद्रासाठी सल्लागार मंडळची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये – डॉ. दिनेश अमळणकर, अनिल कुमार सिन्हा, चिसुंग अन्ह, हायवॉन ली, हावॉन कु, जे जोंग ली, जे. एच. अन्ह, जोंग मान किम, नागेंद्र कौशिक, रमेश अय्यर, रौनाग पुंगालिया, सचिन सातपुते, संग जुन, सुंगवू बेंजामिन, सुन ह हा पार्क, तेसुंग किम, यंग क्यू ह्वांग, यंग पाक ली यांचा समावेश आहे.

कार्यक्रमास एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डॉ. किर्ती धारवाडकर, पीसीसीओईआरचे डॉ. हरिश तिवारी, पुणे बिझनेस स्कूलचे डॉ. गणेश राव, एनएमव्हीपीएमचे डॉ. रामचंद्र जहागीरदार, एसबीपीएसच्या डॉ. बिंदू सैनी, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button