महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीयराष्ट्रीयसामाजिक

चुकीच्या प्रथा-परंपरांना फाटा देणारा कौतुकास्पद लग्नसोहळा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ५ जून २०२५) लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी, प्रथा-परंपरा सध्या नव्याने चर्चेत आल्या आहेत. आपल्याच पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील हगवणे प्रकरणाचे निमित्त झाले आणि संपूर्ण मराठा समाज टीकेचे लक्ष्य बनला आहे. दुसरे काही लिहू शकत नाही किंवा दाखवू शकत नसलेल्या प्रसिध्दीमाध्यमांच्या रडारवर मराठा समाज असल्याचे दिसते आहे. हा विषय ट्रेंडिंग असल्याने सोशल मिडीयावरही याच विषयाचे कुरण सुरू आहे.

सरसकट नसला तरी मराठा समाजातील तालेवार घराण्यांमधील बहुतांश लग्नसोहळ्यांमध्ये होणारी करोडो रूपयांची उधळपट्टी हा सर्वाधिक कळीचा मुद्दा आहे. जोरात लग्न लावायचे, या इर्षेतून अशा लग्नसोहळ्यांमध्ये नको इतकी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. त्यासाठी दोन्ही बाजूकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. इतक्या खर्चाची खरोखर गरज आहे का, याचा फारसा विचार केला जात नाही. कोणीही किती टीका केली तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही. लग्नपत्रिकेत जाहीर केलेली वेळ पाळलीच जात नाही. गोरज मुहुर्त हा प्रकारच राहिला नाही. असे प्रकार उपस्थितांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारे आहेत. तासभर उशीर होत होता, तोपर्यंत पाहुणेमंडळींकडून फारशी कूरकूर केली जात नव्हती. आता मात्र तीन तास, चार तास उशीर होणे हे नेहमीचे झाले आहे. सायंकाळी सहाचे लग्न असताना रात्री दहा वाजता ते लावण्यात आल्याची उदाहरणे दिली जातात. लग्नातील प्रचंड सत्कार सोहळे डोकेदुखीचा विषय झाला आहे. शेकडो नावांचा पुकारा केला जातो. नेतेमंडळींचे सत्कार, पै पाहुण्यांचे सत्काराची भली मोठी यादी असते. जावयांचे मान-सन्मान वेगळेच. स्वागत-आशिर्वादाच्या नावाखाली भाषणांची चढाओढ लागते. या सगळ्या प्रकारात लग्नासाठी दोन्ही कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन वेळेत आलेल्या सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते. त्यांच्या उपस्थितीची दखल तर घेतली जात नाहीच, हा सगळा तमाशा पाहण्यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो, त्याचे कोणालाही सोयरसुतक नसते. गेल्या काही वर्षात, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेकडो सोहळे पार पडले. कोणी निंदा, कोणी वंदा त्याचा विचार न करता चुकीच्या पध्दतीने ही वाटचाल सुरूच होती. तथापि, हगवणे प्रकरणानंतर सगळ्या स्तरातून मराठा समाजावर टीका होऊ लागली. त्याची दखल घेणे सर्वांना भाग पडले. त्यातून पुणे-पिंपरीत बैठकाही सुरू झाल्या आहेत.

अशा वातावरणात मराठा समाजातील तालेवार घराण्यातील एक शिस्तबध्द आणि चुकीच्या प्रथा परंपरांना फाटा देणारा एक विवाह सोहळा रावेत-किवळे येथे पार पडला, ज्याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सोमवारी, २ जूनला आकुर्डीतील व्यावसायिक गोरख भालेकर यांच्या मुलाचे तन्मयचे लग्न याच भागातील फूलचंद गोडसे यांच्या मुलीशी (ऋतुजा) झाले. दुपारी ११ वाजून ५९ मिनिटांनी लग्नाचा महुर्त होता. मुहुर्ताची नेमकी वेळ साधून मंगलाष्टके सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी कुटुंबप्रमुख या नात्याने प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व्ही. एस. काळभोर आणि दोन्ही परिवाराच्या अत्यंत जवळचे नातेवाईक उपस्थित होते. मराठीचे सुपरस्टार अभिनेते भरत जाधव यांची विवाहप्रसंगी आवर्जून हजेरी लावली. कारण दिशा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून भालेकरांचे भरत जाधव यांच्याशी स्नेह आहे. भालेकरांचे जावई शिवराज काटे यांचा एकमेव सत्कार यावेळी झाला.

संध्याकाळी सातपासून रिसेप्शन होते. खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अमर साबळे, राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, त्रिंबकराव भिसे, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह माजी महापौर संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, सचिन साठे, राहूल कलाटे, नाना काटे, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, रवी लांडगे, राजाभाऊ गोलांडे, शांताराम भालेकर, पिंपरी पालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे तसेच मोठ्या संख्येने आजी-माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी वधुवरांना आशिर्वाद दिले. त्यांच्या उपस्थितीत फोटोसेशन झाले. काहींनी अल्पोहार, फलाहाराचा आनंद घेतला. कोणतेही कर्कश्य संगीत नाही. एकही सत्कार झाला नाही. कोणाच्याही नावांचा पुकारा नाही. कोणीला अतिरिक्त महत्व नाही की कोणाकडे दुर्लक्ष नाही. मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील पै पाहुणे आले. नेहमीच्या लग्नाचा अनुभव असणाऱ्यांच्या दृष्टीने भालेकर-गोडसे हा लग्नसोहळा निश्चितपणे वेगळा होता. सत्कार-समारंभ आणि नको त्या गोष्टींना पूर्णपणे फाटा देणारा होता. त्यामुळेच त्याची नोंद समाजाने घेतली पाहिजे, असे वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button