महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयकृषीचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

भारताला कृषी विकासावर भर द्यावा लागेल – शैलेंद्र देवळाणकर

पुणे बिझनेस स्कूलच्या ॲग्रोवाईस - २५ मध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Spread the love

पिंपरी पुणे (दि. २९ मार्च २०२५) – जागतिक पातळीवरील विकासाचा रेटा पाहता भारताला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासावर भर द्यावा लागेल; तरच भारत मोठी प्रगती करू शकेल. आर्थिक उदारीकरणामुळे जागतिक पातळीवरील मोठमोठ्या संस्था आपले बस्तान बसवत आहे. आपण स्वतःभोवती सुरक्षा कवच तयार करून भारतातील कृषी, उद्योग व्यवसाय यासाठी सुरक्षित व्यापार करू शकणार नाही. आपल्याला जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. भारत सरकार या दृष्टीने वाटचाल करताना दिसत आहे. शेती विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच कृषी उद्योजकांनी जागतिक स्पर्धेचा विचार करून पुढील वाटचाल ठरवली पाहिजे. कृषी क्षेत्राचा मोठा वाटा भारताच्या विकासामध्ये यापुढील काळात राहील, असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस) वतीने ‘ॲग्रीवाईज २०२५’ या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (२९ मार्च) निगडी येथील संस्थेच्या सभागृहात केले होते. यावेळी दुबई येथील देवा इलेक्ट्रिक सिटी अँड वॉटर ॲथोरिटीचे व्यवस्थापक सोमनाथ पाटील, महाराष्ट्र इकॉनोमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन इटकर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते. यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी पीबीएसच्या वतीने ॲग्री वाईज या मासिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘कृषी उद्योग भूषण गौरव पुरस्कार २५’ चे वितरण करण्यात आले. द्राक्ष उत्पादक संघ पुणेचे जितेंद्र बिडवई, सावित्री फार्मचे अजित घोलप, गोल्डन एरा इको सर्व्हिसेसच्या प्रियंका पाटील, फ्रेटली फार्मचे विश्वजीत मोरे, शिवार फाऊंडेशनचे विनायक हेगावे, कृषीकाव्य ॲग्रो व्हेरमीकंपोस्टच्या कविता ढोबळे आदींचा कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ज्या देशांची अर्थव्यवस्था औद्योगिक उत्पादन, सेवा क्षेत्र आदींवर अवलंबून आहे; त्या अर्थव्यवस्थेस मंदीच्या काळात फटका बसत असल्याचे दिसून येते. परंतु कृषी क्षेत्रावर आधारित ज्या देशांची अर्थव्यवस्था आहे ती जागतिक मंदीच्या काळातही टिकून राहत योग्य प्रकारे विकसित होत आहे; असे पहायला मिळते. याचे उत्तम उदाहरण भारताचे आहे. जागतिक स्पर्धा पाहता आपल्या शेती आणि शेतकरी पूरक उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली पाहिजे. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होईल, असे सचिन इटकर यांनी सांगितले.

भारतामध्ये शेती खालील लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. आज विशिष्ट देशांची अन्नधान्याची गरज ओळखून त्याप्रमाणे शेती उत्पादन आणि शेतीपूरक उद्योग उभारणी केल्यास; भारतातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील आणि देशाच्या विकासाल चालना मिळेल, असे सोमनाथ पाटील म्हणाले.

दुपारच्या सत्रात कोरोमंडल इंटरनॅशनलचे जितेंद्र कोळपे, ॲग्री सेल्सिचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामसी कृष्णा, बायोटेकचे संस्थापक संचालक संजय वायाळ, सुशील जाधव, तुषार देवकर, अरविंद कडूस, लोका अजय रेड्डी यांनी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रास्ताविक डॉ. गणेश राव, सूत्रसंचालन आणि आभार डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button