सविंधानात्मक हक्कांसाठी आदिवासी समाजाचे संघटन आवश्यक – डॉ. संजय दाभाडे
आदिवासी क्रांतीकारकांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, पुणे (दि. २ जानेवारी २०२५) आदिवासी समाजाला संविधानात्मक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी समाजाचे मजबूत संघटन होणे आवश्यक आहे. तसेच समाजातील तरुण-तरुणींनी पारंपरिक उत्पन्नाचे स्त्रोत, आपली संस्कृती याची जपवणूक करून उच्च शिक्षणाचा मार्ग अवलंबून त्यातून नवीन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे तरच आदिवासींचा विकास होईल असे प्रतिपादन आदिवासी समाजाचे कायदेशीर लढा लढणारे अभ्यासक डॉ. संजय दाभाडे यांनी केले.
धानोरी, येथे पुणे व पिंपरी चिंचवड शहर आदिवासी क्रांतिकारक संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण भालचीम यांच्या हस्ते आदिवासी भिमाशंकर तरुण मंडळ व सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ, मुंजाबा वस्ती, धानोरी यांनी आयोजित केलेल्या
शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
शोभायात्रेत आदिवासी बांधव पारंपरीक वेषभूषेत आणि बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल, राणी दुर्गावती अशा अनेक क्रांतीकारकांच्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. यामध्ये पालघर जिल्ह्यातील तारपा नृत्य पथक आणि जुन्नर तालुक्यातील माणिकडोह, राजूर येथील पथकाने आपल्या शैलीतून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष विठ्ठल कोथेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल वाघमारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, समाजाने एकजुटीने लढा उभारला तर यश नक्कीच मिळते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जुन्नर, आंबेगाव तालुक्यात हिरडा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याला योग्य बाजार भाव मिळण्यासाठी व नुकसान भरपाईसाठी सातत्याने जिद्दीने पाठपुरावा केल्याने अनुदान मंजूर झाले. आदिवासी समाजातील युवक, युवतींपुढे अनेक समस्या आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे देखील आवश्यक आहे यासाठी समाजातील अधिकारी वर्गाने पुढे येऊन जबाबदारी घ्यावी असेही आवाहन डॉ. अमोल वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आदिवासी समाजाचे नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या नंतर एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. धानोरी येथील आदिवासी महिलांनी पारंपरिक नृत्य आणि बहारदार नाटिका सादर केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेजूर, ठाकरवाडी ता. जुन्नर या शाळेतील विद्यार्थ्यांनी डांगी नृत्यासह आणखी दोन बहारदार आदिवासी नृत्य सादर करून बालचमुने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. प्रसिद्ध आदिवासी गायक विक्रम कवटे यांनी आपल्या सुरेल आवाजात आदिवासी गीते गायन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
आमदार बापू पठारे म्हणाले की, आदिवासी समाजाच्या शहरातील, अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव कटीबद्ध राहू. माजी नगरसेवक रेखाताई टिंगरे, मारुती (नाना) सांगडे, भाऊसाहेब सुपे, आशाताई सुपे, उषाताई मुंढे तसेच डॉ. पुनाजी गांडाळ, कृष्णा भालचिम, ॲड. तुषार गवारी, वामन जढर, गुलाब हिले, गोविंद पोटे, लेखिका सीताताई शेळकंदे, कुसुमताई गभाले, डॉ. संतोष सुपे, बाळासाहेब डोळस, मंजूर तडवी, जनार्दन शेखरे, अजय आत्राम, दिपक विरणक, बाळू तळपे आदींसह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव व महिला उपस्थित होते.
प्रास्ताविक सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ धानोरीचे अध्यक्ष पांडुरंग ढेंगळे, सुत्रसंचालन आनंद भवारी व सुरेखा लेंभे, आभार दीपक साबळे यांनी मानले.