महाराष्ट्रपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीय

सरकारचे लोकाभिमुख निर्णय आणि सर्व घटक पक्षांचा योग्य समन्वय यामुळे विजय – योगेश बहल

सर्व मतदारांचे समन्वय समितीच्या वतीने आभार

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २५ नोव्हेंबर २०२४) महायुती सरकारचे लोकाभिमुख निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वास यामुळे राज्यात माहितीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तसेच प्रचारात सर्व घटक पक्षांचा योग्य समन्वय यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात विजय सोपा झाला असे प्रतिपादन समन्वयक व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश बहल यांनी केले.

महायुती सरकारने मागील अडीच वर्षात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयावर महाराष्ट्रातील नागरिकांनी विश्वास दाखवून महायुती सरकारला भरभरून मतदान केले. याचे सर्व श्रेय महायुती सरकारने नेमलेल्या समन्वय समिती आणि स्टार प्रचारकांचे आहे. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल पिंपरी चिंचवड समन्वय समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, असे प्रतिपादन समन्वयक व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी केले. पिंपरी येथे शनिवारी (दि. २३) झालेल्या मतमोजणी नंतर मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बहल बोलत होते.

यावेळी समन्वयक व पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे, आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, माजी खासदार अमर साबळे, शिवसेना शहराध्यक्ष निलेश तरस, माजी महापौर व भोसरीच्या प्रचार प्रमुख मंगलाताई कदम, संजय मंगोडेकर, माजी नगरसेवक यशवंतराव भोसले, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आतिष बारणे आदी उपस्थित होते.

यावेळी सदाशिव खाडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लागू केलेल्या अनेक योजनांपैकी लाडकी बहिणी योजना, मुलींच्या शिक्षणासाठी फी माफीची योजना, सोयाबीनला अपेक्षित भाव, ज्येष्ठ नागरिकांसाठी मानधन योजना, महिलांसाठी-मुलींसाठी एसटी बस प्रवासात सवलत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वीज बिलात सवलत अशा अनेक योजना महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणाऱ्या योजनांमुळे महायुती सरकार पुन्हा स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास माध्यमांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सर्व माध्यम प्रतिनिधी तसेच सर्व मतदारांचे समन्वयक समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो असेही खाडे म्हणाले.

आमदार उमा खापरे यांनी सांगितले की, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने येणारे सरकार पूर्ण करेल. नागरिकांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना पुढेही सुरू राहतील आणि महाराष्ट्र पुन्हा देशात एक नंबर होईल.

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाले की, या तीनही मतदार संघातील विजयामध्ये आरपीआयच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. नियोजन करून प्रचार केला आहे. पिंपरी ची जागा आरपीआय ने मागितली होती. परंतु आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही अर्ज मागे घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी एका दिलाने काम करून तिन्ही जागा जिंकल्या. आता वरिष्ठांनी आणि येणाऱ्या सरकारने पिंपरी चिंचवड शहरातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे.

स्टार प्रचारक माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितले की, मी राज्यातील ८५ विधानसभा मतदारसंघात सभा घेतल्या. सर्वत्र महायुतीला सकारात्मक वातावरण होते. भाजप व मित्र पक्षांचे प्रचाराचे योग्य नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भव्य सभांमधून मतदारांना केलेल्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button