आपुलकी या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे महेश लांडगे – राहुल जाधव यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. १८ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे हे सर्वांच्या संपर्कात असतात लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवतात. आपुलकी या शब्दाचा खरा अर्थ महेशदादा लांडगे असा असल्याचे प्रतिपादन माजी महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.
माजी महापौर जाधव म्हणाले की, आमदार महेशदादा लांडगे यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला. महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांसाठी त्यांनी केलेले काम यापूर्वी कोणीही केले नव्हते. तळवडे ते दिघी पर्यंत असलेल्या समाविष्ट गावांचा त्यांनी विकास केला. सन १९९७ ते २०१७ पर्यंतचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला. ज्या गावाची जी गरज आहे, ती गरज तो विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तळवडे येथे बायोडायव्हर्सिटी प्रकल्प आणला. चिखली येथे संत पीठ साकारले. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी मोशी येथे साडेआठशे बेडचे भव्य रुग्णालय उभारण्यात येत आहे. ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध आहे त्या गावांमध्ये स्मशानभूमी आणि दशक्रिया विधी घाट सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. चिखली, च-होली, मोशी या भागातील स्मशानभूमी व दशक्रिया विधी घाट सुधारणा केल्या आहेत. च-होली येथे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. मोशी, डुडुळगाव सीमेवर क्रिकेट स्टेडियम ला मंजुरी देण्यात आली आहे. औद्योगिक प्रदर्शन केंद्र तसेच संविधान भवन, अंतर्गत रस्ते सिमेंटचे रस्ते, विकास आराखड्यातील रस्ते अशी कितीतरी कामे आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकाळातील सांगता येतील असे माजी महापौर जाधव म्हणाले.
आमदार महेशदादा लांडगे यांनी कामाचा जणू डोंगर उभा केला आहे. या विकास कामांच्या आणि प्रचंड जनसंपर्काच्या बळावर आमदार लांडगे हे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास माजी महापौर जाधव यांनी व्यक्त केला.