बाबू नायर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती
पिंपरी, पुणे (दि. १० नोव्हेंबर २०२४) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक बाबू नायर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून व काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून प्रदेश काँग्रेसतर्फे नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
बाबू नायर यांनी विद्यार्थिदशेपासून एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षकार्याला सुरुवात केली. पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये ते सदैव सक्रिय राहिले असून, दोन वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले.
शहराचा पायाभूत विकास आणि पर्यावरण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. पुणे जिल्ह्यातील केरळवासीयांच्या मल्याळी फेडरेशनचे ते पदाधिकारी आहेत. तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड येथील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थांमध्ये ते पदाधिकारी असून, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील हजारो एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर्स व एजंट्स यांचे फार मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे.