कामाच्या बळावर महेशदादा यांचा विजय निश्चित – उत्तम केंदळे
यमुना नगर निगडीतील नागरिकांची कामे मार्गी लावल्या चे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. ६ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे हे कामाच्या बळावर मागील दहा वर्षात घराघरात पोहोचले आहेत. केलेल्या विकास कामांच्या बळावर ते तिसऱ्यांदा आमदार होतील एवढेच नव्हे तर महायुती सरकार मध्ये ते मंत्री झालेले दिसतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे माजी सभापती उत्तम केंदळे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
आमदार लांडगे यांनी विविध विकास कामे केली आहेत. यमुना नगर प्रभाग क्रमांक १३ मधील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. शास्ती कराचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याने अडीच हजार मालमत्तांना त्याचा लाभ होणार आहे. प्राधिकरणाची घरे फ्री होल्ड करण्याचा विषय त्यांनी मार्गी लावला. त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात विशेषता सेक्टर नंबर २१, २२ मधील नागरिकांना होणार आहे. निगडीतील भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे भूमिपूजन भाजपच्याच कार्यकाळात झाले आणि ते पूर्णत्वासही गेले. निगडी गावठाणा मधील शाळा आणि बाजारपेठ जोडणारा निगडी गावठाण भुयारी मार्गाच्या कामासाठी निधी देऊन आमदार महेश दादा लांडगे यांनी हे काम पूर्णत्वास नेले. टिळक चौक ते दुर्गा नगर चौक तेथून त्रिवेणी नगर चौक या भागात अर्बन स्टेट डेव्हलपमेंटच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना संतोष लोंढे व नितीन लांडगे यांच्या स्थायी समिती सभापती पदाच्या कार्यकाळात निगडी स्मशानभूमीसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपलब्ध करून दिला. निगडी स्मशानभूमी मध्ये सीमाभिंत, विद्युत व गॅस दाहिनी सुविधा त्यामुळे उपलब्ध झाली असे केंदळे यांनी सांगितले.
शहरातील दुसरा लाईट हाऊस प्रकल्प यमुना नगरला उभारण्यात आमदार महेश दादा लांडगे यांनी पुढाकार घेतला. दीड वर्षात या ठिकाणी ७०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आमदार लांडगे यांनी सेक्टर नंबर २२ मधील समाज मंदिरे व बुद्ध विहारांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निधीतून मोठी मदत दिली. यमुना नगर येथील २५ पेक्षा जास्त सोसायटीमध्ये पेविंग ब्लॉक बसविले. विविध कामांच्या माध्यमातून आमदार लांडगे हे घराघरात पोहोचले असल्याने ते तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होतील व महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होतील असा विश्वास केंदळे यांनी व्यक्त केला.