महेशदादा लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली
माजी महापौर मंगलाताई कदम यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी विकास कामे करताना पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत भूमिपूजन झालेली कामे, अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले असे प्रतिपादन माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या मंगलाताई कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले.
मंगलाताई कदम म्हणाल्या की, महायुतीमध्ये भोसरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. मित्रपक्ष या नात्याने आम्ही महायुतीचे काम करत आहोत. आमदार महेश दादा लांडगे यांनी निवडणूक ही निवडणुकीपूर्तीच ठेवली. मागच्या वेळी महायुती नव्हती. मात्र आमदार लांडगे तसेच कार्तिक लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. कृष्णा नगर मधील रायरेश्वर मंदिर सभा मंडप, कृष्ण मंदिर सभा मंडप, शिवाजी पार्क मधील विठ्ठल मंदिरातील सभामंडप, अशी अनेक कामे आम्ही विरोधात असताना त्यांना सांगितली ती त्यांनी पूर्णत्वास नेली. भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाले होते ते त्यांनी पूर्णत्वास नेले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, संत पीठ प्रकल्प साकारले. बफर झोनचा प्रश्न मार्गी लावला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र त्यांच्याच पुढाकाराने झाले. संविधान भवन ची संकल्पना त्यांनी मांडली ती ही पूर्णत्वास येणार आहे. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा प्रश्न, शास्तीकर माफीचा प्रश्न आ. लांडगे यांनी मार्गी लावला. मोरे वस्तीतील काही भागात अडचणींचा भाग असल्याने रस्त्याचे प्रश्न होते ते त्यांनी सोडवले असे मंगला कदम यांनी सांगितले.
आ. लांडगे यांनी नगरसेवकाच्या पातळीवर येऊन, त्यांच्या बरोबरीने काम केले. कोविड काळात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा राबवली. अनेकांना मदतीचा हात दिला. शेवटी काम होणे महत्त्वाचे असते त्या त्या भागातील काम झाल्यास त्या नगरसेवकालाच त्याचे श्रेय मिळत असते त्यामुळे आपल्या पाठीशी उभा राहणारा आमदार म्हणून आम्हाला नेहमीच आमदार महेशदादा लांडगे यांचे कौतुक वाटले असे कदम म्हणाल्या. विविध प्रकारची नागरी सेवा, सुविधा आदी कामे मार्गी लागावी यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी उभारलेल्या यंत्रणेचे अतिशय कौतुक वाटते. शेवटी काम करतो तो चुकतो आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडूनही एखादी चूक झालेली असू शकते. मात्र त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे कदम यांनी सांगितले. कामाच्या बळावर आमदार महेशदादा लांडगे हे पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी महापौर मंगला कदम यांनी व्यक्त केला.