महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

अजित दादा विरुद्ध महेश दादा नुरा कुस्ती – सुषमा अंधारे

बीजेपी आणि एनसीपी म्हणजे "चोर चोर मौशेरे भाई" - सुषमा अंधारे, चेतन पवार (उबाठा) विरुद्ध राहुल कलाटे (भाजप) लढत लक्षवेधी ठरणार

Spread the love

पिंपरी, पुणे (०८ जानेवारी २०२६) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराबाबत टीका करणे म्हणजे नुरा कुस्तीचा सामना आहे. निवडणुका संपल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र बसून “चोर चोर मौशेरे भाई” प्रमाणे जनतेच्या पैशाची लूट करतील अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पिंपरी येथे केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली असून गुरुवारी अनेक नेत्यांनी पिंपरीत बैठका, सभा घेतल्या.

गुरुवारी, पुनावळे – ताथवडे – वाकड, प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार (ड) आणि सागर विजय ओव्हाळ (अ) यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उमेदवार चेतन पवार, सागर ओव्हाळ आणि जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, प्रभारी अशोक वाळके, रोमी संधू, रामभाऊ सपकाळ, कैलास नेवासकर, विकास पवार, सुमित निकाळजे, राहुल पवार, विजय दगडे, नितीन शिंदे, धनंजय पवार, संदीप बोरगे, हरीश सपकाळ, किरण पवार, किसन ओव्हाळ, सागर पवार, कृष्णा पवार, नरेश गराडे, निलेश पवार, अक्षय भोसले, योगेश पवार, आशिष मिश्रा आदींसह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चेतन पवार विरुद्ध भाजपाचे राहुल कलाटे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

यावेळी सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना सांगितले की, निवडणूक आयोग भेदभाव करत आहे. आमच्या पक्षाचे मशाल हे चिन्ह प्रिंटिंग मध्ये व्यवस्थित दिसत नाही. ज्याप्रमाणे तुतारी आणि पिपाणीचा घोळ मागील निवडणुकीत घातला होता. तसाच घोळ या निवडणुकीत निवडणूक आयोग मशाल बाबत करीत आहे. मतदारांमध्ये मशाल चिन्हाबाबत आवर्जून संभ्रम निर्माण करणे हा आयोगाचा खोडसाळपणा आहे. आम्ही निवडणूक आयोगाला उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. याबाबत शिवसेनेने स्पष्टपणे तक्रार नोंदवली आहे. उबाठा च्या मशालीचे चिन्ह बाबत संदिग्धता निर्माण व्हावी असे काम आयोगाने केले आहे.

पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले. परंतु या शहराचे राष्ट्रवादी व भाजपने वाटोळे केले आहे. ताथवडे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्ष झाली. तरी अद्यापही येथील जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे वर्ग केल्या नाहीत. शहरात वाहतूक, पाणी पुरवठा, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट, अनधिकृत बांधकाम, जमीन अधिग्रहण, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा प्रश्न या समस्या आ वासून उभ्या आहेत. तरी देखील राष्ट्रवादी व भाजप भ्रष्टाचारात गुंग आहेत. येथील आमदार महेश दादा लांडगे बोलले की, महाराष्ट्रातील सर्व गुन्हेगारीचा आका अजित दादा पवार हे स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी भाजपमध्ये आले आहेत. याचा अर्थ अजित पवार भ्रष्टाचारी आहेत. हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील सांगितले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगतात. मग एव्हढ्या भ्रष्टाचारी माणसाला भाजपने सोबत घेतले आहे, म्हणजे भाजपची ही अपरिहार्यता आहे काय ? भाजप भ्रष्टाचारांवर पांघरून घालते. अजित दादांनी महेश दादांवर टीका करणे आणि महेश दादांनी अजित दादांवर टीका करणे म्हणजे कोकणात दोन भाचे करतात तशी नुरा कुस्ती आहे.

महेश दादा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रतिनिधी, भालदार, चोपदार आहेत. या निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करतील. म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघेही “चोर चोर मौशेरे भाई” आहेत. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तत्वनिष्ठ पक्ष आहे. आम्ही संविधानिक चौकट मानतो. भाजपने लोकांना धमकावून निवडणूक स्पॉईल करू नये. नाहीतर निवडणुकीचा फार्स करण्याऐवजी सरळ सरळ उमेदवारीचा लिलाव करावा. ज्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास नाही ते असे गलिच्छ राजकारण करीत आहेत. या राजकीय संस्कृतीच्या ऱ्हासाला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.

खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे प्रॉडक्ट आहे. शिवसेना नेतृत्व तयार करणारी संघटना आहे. परंतु भाजपा दुसऱ्यांची मुले घेऊन त्यांच्या पाळणाघरात सांभाळण्याचा उद्योग करीत आहे. आत्ताच्या भाजप मध्ये सुखावलेले पाटील आणि दुखावलेले पाटील असे दोन प्रवाह आहेत. ‘चाऊस’ म्हणजे चादर उचलणारे सभासद यांचा भाजपमध्ये विचार होत नाही. दुसऱ्या पक्षातले उमेदवार पळवणे म्हणजे भाजप मोठी झाली असे नाही, तर ही भाजपची सूज आहे. हे मूल्यहीन राजकारणाचे नवे मॉडेल भाजपने तयार केले आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्पष्टपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वजनिक प्रश्नांबाबत पुढे येऊन लढा उभारत आहे. या निवडणुकीत चर्चा भरकटू न देता दुसरीकडे न नेता भाजपाने आणि राष्ट्रवादीने मतदारांना सांगावे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लूट नेमकी कोणी केली असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button