विद्यार्थ्यांनी स्व संकल्पना विकसित करावी – दशरथा एम.
पीसीयू येथे क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घघाटन


पिंपरी, पुणे (दि. ८ सप्टेंबर २०२६) योग्य उद्योग भागीदारी, सक्षम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ऑटोमोबाईल क्षेत्रातील बदल, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, स्मार्ट सिटी, संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि एम्बेडेड सॉफ्टवेअर यांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी केवळ केवळ कोडिंग पुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी स्व संकल्पना विकसित करणे आवश्यक आहे, असे दशरथा एम. यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीस आणि ब्लॅकबेरी क्यूएनएक्स यांच्या सहकार्याने “क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्स”चे नुकतेच उद्घघाटन करण्यात आले. या सेंटर मध्ये विद्यार्थ्यांसाठी एम्बेडेड सिस्टिम्स, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि इंटेलिजंट मोबिलिटी आणि उद्योगातील अत्याधुनिक तांत्रिक प्रवाह या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीसचे प्रोग्राम डायरेक्टर दशरथा एम., ब्लॅकबेरी क्यूएनएक्स चे डायरेक्टर वीरकुमार बीडे, प्राध्यापक, पीसीयूचे विद्यार्थी उपस्थित होते.

वीरकुमार बीडे यांनी सांगितले की, क्यूएनएक्स रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. आता आधुनिक ऑटोमोटिव्ह, मेडिकल डिव्हाइसेस, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि सेफ्टी क्रिटिकल सिस्टिम्समध्ये त्याचा वापर वाढत चालला होत आहे. उद्योगाच्या या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्यांसह स्व संकल्पना विकसित करण्याची आज गरज आहे.

कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी सांगितले की, क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्स मुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि रोजगार संधी विद्यापीठातच उपलब्ध होतील. प्रत्येक विद्यार्थ्याने या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रम संयोजन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, समन्वयक डॉ. नीरू मलिक यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
———————————–



