महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

पिंपरी गावातील “गिरनार पर्वत दर्शन” या भव्य देखाव्याचे सोमवारी उद्घाटन

पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानचे ५१ व्या वर्षात पदार्पण

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १४ सप्टेंबर २०२६) धार्मिक, सामाजिक उपक्रम बरोबरच सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने ५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यावर्षी “गिरनार पर्वत दर्शन” हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. हा देखावा पहिल्या दिवसापासून गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे.

सोमवारी (दि.१४) “श्रीं” ची प्रतिष्ठापना आणि देखाव्याचे उद्घाटन सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष विनायक कुलकर्णी व मंडळाचे आधारस्तंभ प्रवीण कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
यावेळी गिरनार येथील गुरुवर्य , महंत, मार्गदर्शक, सेवेकरी, समाजसेवक, जेष्ठ नागरिक तसेच उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

मंडळाची धार्मिक व सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखत या वर्षी गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे भजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर , गौरी सजावट स्पर्धा, मोदक स्पर्धा, निबंध, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, अथर्वशीर्ष पठण, स्वामी चरित्र, दुर्ग सप्तशती पठण आणि महिला भगिनींचा आवडता “खेळ पैठणीचा” अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष केतन जाचक, खजिनदार समीर कुदळे आणि उपखजिनदार सौरभ कुदळे यांनी दिली.

सर्व स्पर्धा मोफत असून स्पर्धेतील बक्षीस विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. या मंडळाची स्थापना १९७६ साली झाली. अनेक मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्ष पद भूषवून संस्थेच्या नावलौकिक वाढविला आहे. सर्व नागरिक, गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, तरुणाईचा उत्साह आणि महिला भगिनींच्या सहभागाने या वर्षी पंचक्रोशीत आदर्श ठरेल असे उपक्रम सुवर्ण महोत्सवी वर्षात राबवून गणेशोत्सव अधिक उपयुक्त व आदर्शवत करण्याचा संकल्प केला आहे. सर्व ग्रामस्थांनी, गणेश भक्तांनी, मंडळाचे हितचिंतक, देणगीदार आणि पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button