महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

उपवर्गीकरण म्हणजे समाजात फूट पाडण्याचा कुटिल डाव – मानव कांबळे

उपवर्गीकरणाच्या विरोधात शुक्रवारी पिंपरीत महामोर्चा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २२ जुलै २०२६) अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे म्हणजे समाजात फूट पाडण्याचा राज्य सरकारचा कुटिल डाव आहे. याला अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचा तीव्र विरोध आहे. हे प्रस्तावित वर्गीकरण रद्द करण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.२४ जुलै) भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जेष्ठ नेते मानव कांबळे यांनी दिली.

ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता, भक्ती शक्ती चौकातून निगडी येथील अप्पर तहसील कार्यालय पर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आरपीआयचे महासचिव अविनाश महातेकर, माजी मंत्री बबनराव घोलप आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय संविधान, सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने एल्गार करण्याची वेळ आली आहे. या महामोर्चात लाखो नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवेंद्र तायडे यांनी केले.

पिंपरी येथे बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, कमलेश वाळके, ज्ञानेश्वर कांबळे, बाळासाहेब भागवत, ॲड. उमेश खंदारे, बापू गायकवाड, सुरेश निकाळजे, गंगाताई धेंडे, प्रल्हाद कांबळे, राहुल सोनवणे, गुलाब पानपाटील, अंजना गायकवाड, बाळासाहेब रोकडे, प्रमोद क्षीरसागर गोपाळ मोरे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर कांबळे यांनी सांगितले की, अनुसूचित जातीतील मुख्य समाज असलेल्या चर्मकार समाजाचे नागरिक देखील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चात सहभागी होणार आहेत.

ॲड. उमेश खंदारे यांनी सांगितले की, आरक्षण म्हणजे उपकार नसून संविधानाने दिलेली संधी आहे. ब्रदर कमिटीचा अहवाल आणि आकडेवारी सरकारने जाहीर करावी. त्यानुसार एस सी प्रवर्गातील वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या सरकारी नोकरीतील जागा भरून अनुशेष पूर्ण करावा.

प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले की, कामगार भरती न करता ठेकेदार पद्धतीने काम केले जाते हा एस. सी. प्रवर्गावर अन्याय आहे.

सुरेश निकाळजे यांनी सांगितले की, वर्गीकरण होऊ देणार नाही कोर्टाचा निर्णय प्रथम सार्वजनिक करावा, इम्पेरिकल डाटा जाहीर करावा.

बाळासाहेब भागवत यांनी सांगितले की, मातंग आणि जय भीम यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा मनुवाद्यांचा प्रयत्न आहे तो हाणून पाडू. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.

प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले की उपवर्गीकरण केल्यास समाजामध्ये कृत्रिम विभागणी निर्माण होऊन सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धक्का बसू शकतो. त्यामुळे प्रस्तावित उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. अनुसूचित जातीचा नोकरीतील अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यव्यापी विशेष भरती मोहीम राबविण्यात यावी आणि डी रिझर्वेशन प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी व रोस्टर प्रणाली पारदर्शक करून तिची नियमित अंमलबजावणी केली करावी. तसेच खुल्या प्रवर्गातून करण्यात आलेल्या आरक्षण बाह्य भरतीची श्वेतपत्रिका जाहीर करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. अनुसूचित जातीच्या या प्रलंबित मागण्या आणि प्रस्तावित उपवर्गीकरण कायमस्वरूपी रद्द करावे यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी शुक्रवारी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button