पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लबची आणखी एक यशस्वी मोहीम;
१९ सदस्यांनी सर केला हिमाचल प्रदेशातील ‘पिन भाबा पास’ ट्रेक


पिंपरी, पुणे (दि.२२ जुलै २०२६) पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्लबच्या १९ सदस्यांनी हिमाचल प्रदेशातील अत्यंत आव्हानात्मक ‘पिन भाबा पास ट्रेक’ यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील हिरव्यागार भाबा व्हॅली आणि स्पिती खोऱ्यातील खडकाळ पिन व्हॅली यांना जोडणारा हा ट्रेक देशातील सर्वात निसर्गरम्य आणि आव्हानात्मक ट्रेक पैकी एक मानला जातो. सुमारे १६,१०० फूट (४,९१५ मीटर) उंचीवर असलेला हा ट्रेक Moderate to Difficult श्रेणीत मोडतो. या ट्रेक मध्ये ५१ कि. मी.चे अंतर पायी पार करावे लागते.

या मोहिमेचा कालावधी चंदीगड पासून साधारण ९ ते १० दिवसांचा होता. ट्रेकसाठी जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ मानला जातो. उच्च उंची, कठीण चढाई, बदलणारे हवामान आणि विविध भौगोलिक परिस्थिती मुळे हा ट्रेक अनुभवी ट्रेकर्स साठीही मोठे आव्हान ठरतो. या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील विलक्षण विरोधाभास. सुरुवातीला घनदाट जंगले, नद्या आणि हिरवीगार कुरणे अनुभवता येतात, तर पुढे बर्फाच्छादित आणि खडकाळ प्रदेशातून वाटचाल करावी लागते. पासवर पोहोचल्यानंतर एका बाजूला किन्नौर ची हिरवाई आणि दुसऱ्या बाजूला स्पितीचे ओसाड, तपकिरी डोंगरांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.

पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लबने यापूर्वीही माऊंट एल्ब्रुस (रशिया), माऊंट मेरा पीक (नेपाळ), बुरान घाटी ट्रेक (हिमाचल प्रदेश), थ्री पास ट्रेक, कालापत्थर आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक अशा अनेक यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत.

या मोहिमेत अध्ययन लोंढे (वय १७ वर्षे) आणि भगवान खेडकर (वय ७८ वर्षे) यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि साहसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांमध्ये डॉ. मिलिंद खाडिलकर, सतीश बुरुडे, शिवाजी शिंदे, अरुण बोरकर, अभय जोगदंड, गणेश म्हेत्रे, गिरीश पाटील, अमित तळेकर, प्रशांत विनोदे, निरंजन जोशी, उमेश जांभूळकर, अनिकेत जाधव, अजित भावले, सागर भोंडवे, विलास पवार, दीपक सावंत यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता.
या यशस्वी मोहिमेबाबत माहिती देताना क्लबचे खजिनदार व ट्रेक मधील सहभागी सदस्य अविनाश पिंगळे यांनी सांगितले की, साहसी पर्यटन आणि गिर्यारोहण क्षेत्रात पिंपरी चिंचवडचे नाव देशपातळीवर पोहोचविण्याचे क्लबचे प्रयत्न सातत्याने सुरू राहणार आहेत.
—————————————————————–



