महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

शिवसेनेचा रोजगार मेळावा, राष्ट्र उभारणीची दहीहंडी – सचिन अहिर

विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते चिंचवड येथे शिवसेनेच्या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ३० ऑगस्ट २०२६) पिंपरी चिंचवड शिवसेनेचा रोजगार मेळावा म्हणजे राष्ट्र उभारणीची दहीहंडी आहे. प्रत्येक कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार मिळाला की, ते कुटुंब आर्थिक सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले तरच देश सक्षम होऊन विकसित होईल. आज तरुणांच्या चेहऱ्यावर ताण-तणाव जाणवत आहे, त्यांना रोजगार देण्याचे काम शिवसेना करेल. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उरण, पनवेल भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. पिंपरी, चिंचवड, चाकण तळेगाव या औद्योगिक पट्ट्यात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे विकसित झाले आहे येथे देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष बेरोजगार युवक, युवती आणि कंपनी व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय साधण्याचे काम खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यातून होईल. सरकार देखील शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत आहे. असे रोजगार मेळावे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात घेतले पाहिजे. संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांचे दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा जास्त वजन आहे. त्यांनी विश्वासार्हता कमावली आहे. आता त्यांना दिल्लीत मंत्रिपद मिळावे अशी आशा आहे. खासदार श्रीरंग बारणे हे घेणाऱ्यांच्या पक्षात नसून देणाऱ्यांच्या पक्षात आहेत. ते या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देतील असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. त्याचे उद्घाटन रविवारी (दि.३०), विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खा. श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, संयोजक, शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक निलेश तरस, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश बारणे, जेष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, महानगर प्रमुख राजेश फल्ले, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख खंडूशेठ चिंचवडे, महिला संघटिका शैला भोंडवे, सरिता साने, युवती संघटिका सायली साळवे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ५,५०० बेरोजगार युवक, युवतींनी ऑनलाइन नोंदणी केली आणि ऐनवेळी २५७० युवक युवतींनी नोंदणी केली. एकूण ७५०० पेक्षा जास्त युवक, युवती उपस्थित होते. यावेळी ज्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि निवड झालेल्या दिव्यांग उमेदवाराला महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. राज्यात जवळपास सव्वा दोन कोटी महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम देखील त्यांनी केले आहे. देश आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातून बेरोजगार नागरिक कामाच्या निमित्ताने येथे येतात त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. लोकसभेत काम करत असताना अनेक समिती मध्ये मला प्रतिनिधित्व मिळाले आहे. या माध्यमातून मुंबई, पुणे या परिसरात आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आज ज्यांची निवड झाली आहे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. परंतु येथे सहभागी झालेल्या सर्व बेरोजगारांना रोजगार मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे जाहीर आश्वासन खासदार बारणे यांनी यावेळी दिले.

महापौर रवी लांडगे यांनी सांगितले की, या मेळाव्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अशा मेळाव्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये असे रोजगार मेळावे दर तीन महिन्यांनी विविध भागात घेण्यात येतील असे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले.

या मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे असे शिवसेना उपनेत्या, ज्येष्ठ नगरसेविका व संयोजक सुलभा उबाळे यांनी सांगितले.

आज ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’ देणार आहे आणि पुढील सहा महिने त्यांना मार्गदर्शन करून उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी बाबत माहिती देण्यात येणार आहे असे शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे १२५ कंपनीतील प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील कंपनीतील प्रतिनिधी तसेच ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया अशा नामांकित आस्थापनांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. यावेळी पाचवी पास पासून ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांची लक्षणीय संख्या होती.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button