‘भारत नव-निर्माण चॅलेंज २०२६’ मध्ये पीसीसीओईचे राष्ट्रीय विजेतेपद
एआय स्मार्ट सेफ्टी हेल्मेट प्रकल्पाचा देशपातळीवर गौरव


पिंपरी, पुणे (दि. २२ जुलै २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘भारत नव-निर्माण चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावला. निकमार युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने, एआयसीटीइ आणि अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) यांच्या सहभागातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत पीसीसीओई च्या विद्यार्थ्यांनी “एआय स्मार्ट सेफ्टी हेल्मेट” हा प्रकल्प सादर केला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून एकूण ४५५ पेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता. पीसीसीओई च्या विजेत्या संघात आदित्य आघाव, सिद्धेश देसाई आणि अर्शिया इनामदार यांचा समावेश होता. त्यांना डॉ. धीरजकुमार लाल, डॉ. विनय रंगारी, डॉ. मनीष नारखेडे आणि डॉ. राजेश फुरसुलेयांनी मार्गदर्शन केले. दिल्ली येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात त्यांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी एचसीसी, लार्सन अँड टुब्रो, टाटा प्रोजेक्ट्स, गॅमन इंडिया यांसह देशातील आघाडीच्या बांधकाम कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पीसीईटी ट्रस्ट कार्यालयात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांच्या हस्ते विजेत्या संघाचे मार्गदर्शक स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अजय गायकवाड, डॉ. धीरजकुमार लाल, डॉ. विनय रंगारी, डॉ. मनीष नारखेडे आणि डॉ. राजेश फुरसुले यांचा सत्कार करण्यात आला.
पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला “स्मार्ट सेफ्टी हेल्मेट अँड एआय सिस्टीम फॉर कन्स्ट्रक्शन प्रोग्रेस मॉनिटरिंग” हा अभिनव प्रकल्प विशेष ठरला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), लायडार आणि कॉम्प्युटर व्हिजन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बांधकाम कामगारांची सुरक्षा वाढविणे आणि बांधकाम प्रगतीचे स्मार्ट पद्धतीने निरीक्षण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता.
यासाठी पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीईआरएफ), पुणे यांनी आर्थिक सहाय्य व संशोधन अनुदान दिले होते. या राष्ट्रीय यशामुळे पीसीसीओईच्या संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा देशपातळीवर गौरव झाला आहे. यामुळे पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
——————————————————————



