‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम राबविले पाहिजे – एम. शेख
पीसीयू येथे "इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ प्री समिट" चे यशस्वी आयोजन

पिंपरी, पुणे (दि. ०७ फेब्रुवारी २०२६) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण आणि उद्योग संस्थांनी एकत्र येऊन परस्पर पूरक अभ्यासक्रम राबविले पाहिजेत, त्यामुळे सध्याच्या औद्योगिक ऑटोमेशन प्रकल्पांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील दरी कमी करता येईल. भविष्यात उद्योगांचे यश एकात्मिक ऑटोमेशन सोल्यूशन्स व उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्यामुळे संस्था सतत बदलत्या डिजिटल वातावरणात स्पर्धात्मक राहतील, असे सास ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक एम. शेख यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय “इंडिया एआय मिशन” अंतर्गत, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे “इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ प्री समिट” चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्पेल टेक्नॉलॉजीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र – कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे, एमडॉक्स इंडिया कंपनीचे अंजन बिस्वास, इंजीनियरिंग सर्व्हिसेस प्रमुख रंजीत माथुर, उपसंचालक अंजू बेनीवाल, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. पूर्वा शर्मा, पीसीयू आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवस्कार, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे आदी उपस्थित होते.
“स्किल इंडियाच्या दिशेने एक झेप – उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या सहकार्यातून महत्त्वाकांक्षी तरुण भारतीय मन घडवणे” (Leap towards skill India – creating young aspiring Indian minds through industry – academia collaboration) या विषयावर शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची पॅनल चर्चा घेण्यात आली.
औद्योगिक विकासाचा पुढील टप्पा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या क्षेत्राचा आहे. विशाल दृष्टिकोन ठेवला तर उत्पादन व सेवा क्षेत्रात यामुळे मोठी गुंतवणूक आणि रोजगार संधी उपलब्ध होतील असे स्पेल टेक्नॉलॉजीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले.
यावेळी अंजन विश्वास यांनी सांगितले की, एआय ही अणुऊर्जेप्रमाणे सर्वच क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करणारी कार्यशक्ती आहे. पुढील काळात यायचा जबाबदार व नैतिक वापर करावा लागेल. विकसित भारत घडविण्यात याची भूमिका विशेष असेल. परंतु अंदाधुंद अवलंबित्व आणि डीप फेक पासून सावध राहिले पाहिजे.
डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले की, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकमेकांच्या सहकार्याने कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी एआय आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करावा असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील अभिप्रेत आहे.
अंजू बेनीवाल यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी शासन देखील सकारात्मक आहे. डॉ. पूर्वा शर्मा यांनी सांगितले की, शेती, शिक्षण याचबरोबर उदयन्मुख क्वांटम तंत्रज्ञानात देखील एआय चा वापर लाभदायी ठरेल.
रंजीत माथुर यांनी सांगितले की, पर्यावरण, हवामान, प्रदूषण अशा सामाजिक प्रश्नांवर कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी आणि पुढील पिढीच्या शाश्वत भविष्यासाठी हे तंत्रज्ञान मार्गदर्शक आहे.
पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र पीसीओ मध्ये होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. हे चर्चासत्र म्हणजे पुढील काळात नवी दिल्ली येथे होणाऱ्या शिखर परिषदेची पूर्वतयारी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग क्षेत्रातील तज्ञांची संवाद साधण्याची संधी मिळते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, नियामक समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
——————————————————————


