आंतरराष्ट्रीय परिषदेतील सहभागाने संशोधकांच्या ज्ञान कक्षा रुंदावतात – प्रा. डॉ. विक्रम गद्रे
पीसीसीओईआर येथे आंतरविद्याशाखीय तंत्रज्ञान आणि विज्ञान अभिसरण फ्यूजनएक्स ग्लोबल आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पिंपरी पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) – विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी तसेच नाविन्यपूर्ण संशोधनाचे संकल्पना घेऊन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमधील सहभागाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते. त्याचबरोबर देशाच्या विकासासही हातभार लागतो, असे मत आयआयटी मुंबईचे इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विक्रम गद्रे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च रावेत येथे आंतरविद्यासाठी तंत्रज्ञान आणि विज्ञान अभिसरण (फ्यूजनएक्स ग्लोबल) या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (२६ डिसेंबर) डॉ. गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीओईपीचे डॉ. प्रशांत बारटक्के, आयआयआयटी पुणेचे डॉ. सुशांत कुमार, पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी, फ्यूजनएक्स ग्लोबल परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. राहुल मापारी, डॉ. गोविंद सुर्यवंशी, डॉ. दिपाली शेंडे आदी उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतासह १६ देशांतील संशोधक लेखकांच्या आठशे प्रवेशिका आल्या. यामधून १५३ प्रवेशिकांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली, असे डॉ. राहुल मापारी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा मनोदय आहे. अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमधून भारताची नवी ओळख निर्माण करण्यास मदत होते. जागतिक स्तरावर होणारे संशोधन याचा अभ्यास तसेच संशोधकांची संवाद साधण्याची संधी भारतातील नव संशोधकांना मिळते, असे प्रशांत बारटक्के म्हणाले.
संशोधकांना एकमेकांशी संवाद साधण्या बरोबरच नवकल्पना प्रत्यक्ष मांडण्यास फ्यूजनएक्स ग्लोबल सारख्या परिषदांमधून मदत मिळते. या संधीचा नव संशोधकांनी फायदा घेतला पाहिजे. तसेच संशोधनामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अशा परिषदांमधून मदत मिळते, असे सुशांत कुमार यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात दिनेश मंडलपू, डॉ व्हायोलेटा क्वेटकोस्का, नयन सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या परिषदेला राज्य तसेच देश आणि परदेशातील विविध संशोधक लेखक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पीसीसीओईआर चे संचालक हरीश तिवारी यांनी परिषदेसाठी आलेल्या संशोधकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नलिनी जगताप यांनी तर आभार डॉ. दिपाली शेंडे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी फ्यूजनएक्स ग्लोबल आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या संशोधक, विद्यार्थी यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
——————————————————————



