धुळे येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला राज्यपाल यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट शाळा’ पुरस्कार प्रदान

पिंपरी, पुणे (दि. ९ फेब्रुवारी २०२५) विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारी धुळे जिल्हा येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते “उत्कृष्ट शाळा २०२५” चा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ही धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील २०११ साली स्थापन झालेली एकमेव सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाळा ओळखली जाते. याची दखल घेत नवभारत टाइम्स च्या वतीने प्रचिती इंटरनॅशनल स्कूलला धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा २०२५ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले.
प्रचिती शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील आणि विश्वस्त मंडळ व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सुसंस्कार, नेतृत्वगुण विकसित करून एक सुसंस्कृत, सक्षम नागरिक घडविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. खेळ, कला, विज्ञान, सामाजिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्येही शाळेने उत्तुंग यश मिळवले आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्यासह प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक वैभव सोनवणे व विभाग प्रमुख कांचन अहिरराव आदी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशांत पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन, हस्तकला व क्रीडा स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व राष्ट्रीय सण आयोजित केले जातात. ग्रंथालयात विविध विषयांवरील पुस्तके, मासिके आणि संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. सुसज्य संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि खेळासाठी प्रशस्त क्रीडांगण उपलब्ध आहेत. डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्ट आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी सर्जनशीलता व संशोधनावर भर दिला जातो. दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन, आनंद मेळावा आयोजित करण्यात येतो. जवळपासच्या वाडी वस्तीतील काही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रकल्प कार्य सादरीकरण, सण, उत्सव साजरे करून संस्कृतीची ओळख, क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल आदी खेळांचे आयोजन करून राज्यस्तरापर्यंत विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सलग ६ वर्षापासून प्रचिती शाळेचा इयत्ता दहावीचा आणि १२ वीचा निकाल १०० टक्के लागतो. ऑलिम्पियाड, इंग्लिश मॅरेथॉन, एमटीएस, एनटीएस, रंगोत्सव या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. येथे अनुभवी, कुशल शिक्षक वर्ग आहे. आजपर्यंत प्राचार्या सह १५ शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.



