महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

“हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” नागरिकांचे उत्स्फूर्त आंदोलन

एनपीआरएफ फाउंडेशनचा हरित सेतू प्रकल्पाला तीव्र विरोध

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ०३ डिसेंबर २०२५) “हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” अशा घोषणा देत निगडी, आकुर्डी प्राधिकरण मधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करून रास्ता रोको केला. निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित सेतू प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढलेले देशी वृक्ष तोडण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होतील व अपघात होण्याची शक्यता आहे. हा हरीत सेतू प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा यासाठी “निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन” (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.३ डिसेंबर), सायंकाळी हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटल जवळ, निगडी प्राधिकरण येथे आंदोलन करण्यात आले.

संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखवून, काळ्याफिती लावून, हातात निषेधाचे फलक धरून आंदोलन केले. यानंतर संस्थेच्या वतीने नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिकांनी सह्या करून निषेध नोंदविला.

या परिसरात हरित सेतू प्रकल्प व्हावा अशी कोणाचीही मागणी नाही, तरी देखील कोट्यावधी रुपये खर्च होणारा हा प्रकल्प सुरू केला आहे. नागरिकांच्या गरजा, वाहतुकीची सध्याची परिस्थिती, परिसराची रचना याचा विचार केला नाही. खर्चिक, अनावश्यक प्रकल्प जबरदस्तीने राबविण्याचे धोरण महापालिकेने रद्द करावे. या प्रकल्पामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन अपघात होतील. या प्रकल्पाच्या विरोधात येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तरी महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासना विरोधात नागरिकांनी आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन निषेध नोंदवला. या परिसरात दिवसभर शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व कामगारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पिंपरी चिंचवड मधून रावेत, पुनावळे तसेच द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी येथे अहोरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते व छोटे-मोठे अपघात होत असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.

संस्थेचे मार्गदर्शक व माजी महापौर आर. एस. कुमार, समन्वयक निलेश शिंदे, अतुल भोंडवे अर्जुन दलाल, प्रतिभा जोशी, सूर्यकांत मुथीयान, चंद्रकांत कोठारी, अश्विन खरे, अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, रवी हिंगे, अमोल निकम, बाळा दानवले, समीर जावळकर, विलास कुटे, आकाश शेट्टी, सुनील पाटील, झीशान सय्यद, सतीश काळभोर, चेतन चाफळकर यांनी आंदोलनाचे नियोजन केले होते.

तसेच या आंदोलनात शैलजा मोरे, अनुप मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, भारती फरांदे, धनंजय काळभोर, आप्पा बागल, आबा ताकवणे, योगेश बाबर, विजय शिणकर, वैभवी घोडके, श्रीमंत जगताप, बाळा शिंदे, रामभाऊ पांढरकर, अतुल इनामदार, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुलुक व सभासद तसेच विविध सामाजिक संघटना व सोसायटयाचे पदाधिकारी आदींसह सर्वपक्षीय नेते व माजी नगरसेवक, नगरसेविका यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button