एआय मुळे विश्वाच्या मूलभूत नियमांचा शोध नव्याने घेतला जाईल – डॉ. आशुतोष कोतवाल
पीसीसीओई मध्ये "डार्क मॅटर आणि एआय ऑन अ चिप" विषयावर व्याख्यान


पुणे, पिंपरी (दि. ६ ऑक्टोबर २०२६) वैज्ञानिक संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता यांची पूरक भूमिका असते. उच्च ऊर्जा कण प्रयोगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोग होऊ शकतो. एआय मुळे विश्वाच्या मूलभूत नियमांचा शोध नव्याने घेतला जाईल. आता डार्क मॅटर आणि त्याचे स्वरूप, उत्पत्ती समजून घेण्यासाठी सुरू असलेले वैज्ञानिक प्रकल्प अधिक क्रियाशील, कार्यक्षम होतील. त्यासाठी जलद आणि तत्काळ माहिती शोधण्यासाठी सिलिकॉन चिप वर थेट एआय चा अल्गोरिदम कार्यान्वित करता येणे शक्य आहे. त्यासाठी एआय ची प्रणाली कार्यक्षम, विश्वासार्ह, समजण्यास सुलभ आणि स्पष्टीकरण करता येईल अशी असावी असे मार्गदर्शन डॉ. आशुतोष कोतवाल यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक अभियांत्रिकी विभाग आणि संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिग्ज बोसॉन च्या पलीकडे – डार्क मॅटर आणि चिप वरील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमेरिका येथील ड्यूक विद्यापीठाचे प्रा. डॉ. आशुतोष कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जीआयएसटीचे समन्वयक नंदकुमार पळकर, पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे सचिव डॉ. कौस्तुभ साखरे, विज्ञान भारती, पश्चिम महाराष्ट्र चे कौन्सिल सदस्य अमोल देशपांडे, मानसी जोशी, संगणक विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील आदी उपस्थित होते.
या व्याख्यानाच्या आयोजनात विज्ञान भारती, जीआरएसएस आणि जीआयएसटी यांचे सहकार्य मिळाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, कण भौतिकशास्त्र आणि विश्वातील गूढ घटक यांच्यातील परस्पर संबंधावर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
——————————————————————




