पीसीयूचे उपक्रम सक्षम नागरिक घडविण्यासाठी उपयोगी – कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे
पीसीयू मध्ये प्राध्यापक विकास कार्यशाळा संपन्न


पिंपरी, पुणे (दि. २३ जुलै २०२६) विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधारित शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्य रुजविणे आवश्यक आहे. या त्रिसूत्रांमुळे त्यांचे जीवन समृद्ध होईल आणि ते व्यावसायिकदृष्ट्या आणखी सक्षम होतील. यासाठी पीसीयू येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्या अंतर्गत एआयसीटीई च्या मान्यतेने जागतिक मानवी मूल्य या विषयावर प्राध्यापक विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, ही कार्यशाळा प्राध्यापकांसह देशासाठी सक्षम नागरिक घडविण्यासाठी उपयोगी ठरेल असे मत पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे एआयसीटीई मान्यताप्राप्त प्राध्यापक विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. यशवंत पाटील, निरीक्षक पांडुरंग भिसे, सह समन्वयक डॉ. अनीता माने तसेच सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ११६ नोंदणी प्राप्त झाल्या होत्या. ८५ हून अधिक प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दृष्टीकोनाशी सुसंगत मूल्याधारित शिक्षण, आत्मअन्वेषण, सुसंवादी जीवनशैली आणि सर्वांगीण मानवी विकास याबाबत प्राध्यापकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. सहभागी प्राध्यापकांनी मानवी आकांक्षा, परस्पर संबंध, परस्पर आनंद, समृद्धी आणि अध्यापन पद्धती या विषयांवर संवादात्मक चर्चांमध्ये सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा कुलपती हर्षवर्धन पाटील, पी सी यू नियामक मंडळ सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीयू कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
——————————————————————



