महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

बोगस डॉक्टर, बनावट औषध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा – रवींद्र ओव्हाळ

बनावट औषध, अन्नधान्यातील ओळखण्यासाठी जनजागृती शिबिर घ्यावे

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २६ जून २०२६) राज्यातील बोगस डॉक्टर, बनावट औषध विक्री करणारे आणि दूध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसे पत्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शुक्रवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील दापोडी, फुगेवाडी येथे मागील महिन्यात विषारी दारू पिऊन २२ नागरिकांचा मृत्यू झाला. या दारूकांडातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा “मकोका” अंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

या घटनेतील सर्व आरोपींवर “मकोका” अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ३० मे २०२६ रोजी रवींद्र ओव्हाळ यांनी लिखित पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या घटनेची मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार.

तसेच राज्यात गुटखा बंदी असताना देखील सर्वत्र गुटखा उपलब्ध होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे कारवाईमध्ये काही बोगस डॉक्टर राजरोसपणे क्लिनिक सुरू करून नागरिकांवर उपचार करत असल्याचे समोर आले. तसेच अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये बनावट औषधे तसेच दूध आणि अन्नधान्यांमध्ये भेसळ केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिकांनी बोगस डॉक्टर कडून उपचार घेऊ नयेत. तसेच बनावट औषधे आणि दूध, अन्नधान्य यातील भेसळ ओळखता यावी. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकारने ठिकठिकाणी जनजागृती शिबिर घ्यावेत. तसेच बोगस डॉक्टर, बनावट औषध उत्पादन व विक्री करणारे आणि दूध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांवर देखील “मकोका” लावावा आणि नागरिकांचे जीवन सुखकर करावे अशी मागणी रवींद्र ओव्हाळ यांनी या पत्रात केली आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button