महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार

कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १८ जून २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुकानातील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देत आहोत असा फलक मनपा भवनावर लावावा, तसेच ज्या संस्थेला व ज्या मोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्वरित लाभ घ्यावा, असेही आवाहन आयुक्त यांनी करावे अशी उपरोधित टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चेतन पवार यांनी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभागात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी जागर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना चेतन पवार यांनी सांगितले की, पुनावळे येथील मनपा शाळेसाठी आरक्षित भूखंड खाजगी संस्थेला देऊ नये. तिथे गोरगरिबांच्या मुलांसाठी मनपाने शाळा सुरू करावी. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा आयुक्तांना पत्र देऊन, पत्रकार परिषद घेऊन देखील विरोध दर्शविण्यात आला होता. तरी देखील सोमवारी सर्वसाधारण सभेत तुटपुंज्या रकमेवर ९१ गुंठ्यांचा हा आरक्षित भूखंड ३० वर्षाच्या मुदतीवर नाममात्र भाडेकराराने देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून सभागृहात विरोध करायला हवा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम असल्याने त्यांनी विरोध केला नाही आणि बहुमताच्या जोरावर या प्रशासनाने ठराव मंजूर केला. यासाठी कोणत्या आमदारांचा, वरिष्ठांचा दबाव होता हे आयुक्तांनी जाहीर करावे आणि या मनपा हद्दीतील उर्वरित सर्व भूखंड देखील मोठ्या कारभाऱ्यांना आणि त्यांच्या संस्थेला देण्यासाठी आरक्षित भूखंड भाड्याने देण्याचे दुकान उघडल्याचा फलक मनपा भवनावर लावावा असे चेतन पवार यांनी सांगितले.

तसेच दापोडी येथील सर्वे नंबर १६,१७ मधील क्रीडांगणाचे आरक्षण मनपाने ताबडतोब विकसित करावे, हे आरक्षण देखील खासगी संस्थेला किंवा कारभाऱ्यांना देण्याची भीती आहे. ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा मनपा शिक्षण विभागाकडे वर्ग करून शिक्षण विभागाने तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी.

मनपा शिक्षण विभागाच्या वतीने मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश आणि शालेय साहित्य याची फेरनिविदा काढावी. पवना, इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर, आस्थापनांवर आणि याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. ताथवडे येथे बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तेथे कचरा टाकने बंद करावे. शहरातील सर्वच नाल्यांची साफसफाई करावी.

ताथवडे येथे (सर्वे नंबर ६४/२/१) “ड” प्रभाग कडून खासगी कन्सल्टंट चा अभिप्राय घेऊन नाला शिफ्ट करण्यात आला. तेथे नाला वळविण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील नागरिकांना त्रास देऊन हे सर्व बिल्डर च्या फायद्यासाठी केले आहे. या प्रकल्पाचा बांधकाम परवाना ताबडतोब रद्द करावा अशी मागणी येथील नागरिकांची आहे.

या जागर मोर्चा पारंपरिक वाद्यांचा गजर करीत पोतराजाचा वेष परिधान करून प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

या मोर्चामध्ये सर्व निष्ठावंत शिवसैनिक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button