पीसीसीओइ मध्ये ‘के-नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना होणार


पिंपरी, पुणे (दि. ८ मे २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये ‘के-नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक सेंटर ऑफ एक्सलन्स’ या सेलची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि के. नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक, पुणे यांच्या मध्ये करण्यात आला. पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आणि कंपनीचे संस्थापक, संचालक प्रशांत अग्रवाल यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज श्रीवास्तव, महाविद्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अजय गायकवाड, संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. नरेंद्र देवरे, डॉ. धीरजकुमार लाल, डॉ. विनय रंगारी आदी उपस्थित होते.
के नेस्ट कन्स्ट्रक्शन टेक ही कंपनी अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषतः थ्रीडी प्रिटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलद, मजबूत आणि किफायतशीर इमारती उभारण्यात अग्रेसर आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अल्पावधीत अचूक रचनात्मक बांधकाम करता येते, ज्यामुळे वेळ, खर्च आणि मनुष्यबळ यांची बचत होते. तसेच प्रीकास्ट आणि मॉड्युलर बांधकाम पद्धती, पर्यावरण पूरक आणि शाश्वत बांधकाम उपाययोजना, आधुनिक यंत्रणांचा वापर करून बांधकाम क्षेत्रात नवोपक्रम घडवून आणण्याचे कार्य कंपनी करत आहे.
या कराराच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंगसह अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, उद्योगाशी निगडित प्रकल्पांमध्ये सहभाग, संशोधनाच्या नव्या संधी तसेच रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच प्राध्यापकांना संशोधन आणि नवोपक्रमासाठी आधुनिक सुविधा मिळणार असून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत होणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील अभियांत्रिकी शिक्षणाला नवे बळ मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याच्या संधी निर्माण होणार आहेत अशी माहिती पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
डॉ. धीरजकुमार लाल आणि डॉ. विनय रंगारी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी महाविद्यालयाचे संचालक आणि मार्गदर्शक, प्राध्यापक, समन्वयक यांचे हा सामंजस्य करार केल्याबद्दल अभिनंदन केले.
—————————————-



